हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 16:54 IST2025-07-26T16:53:57+5:302025-07-26T16:54:48+5:30
शाळेच्या इमारतीचा एक भाग अचानक कोसळला. यामध्ये ढिगाऱ्याखाली ३५ हून अधिक मुले गाडली गेली, त्यापैकी २८ जखमी झाले आणि सात मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
राजस्थानच्या झालावाडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पिपलोड सरकारी शाळेत इयत्ता ६ वी आणि ७ वी ची मुलं सकाळच्या प्रार्थनेसाठी जमली होती. याच दरम्यान, शाळेच्या इमारतीचा एक भाग अचानक कोसळला. यामध्ये ढिगाऱ्याखाली ३५ हून अधिक मुले गाडली गेली, त्यापैकी २८ जखमी झाले आणि सात मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
झालावाडच्या एसआरजी रुग्णालयातील शवागाराबाहेर शोककळा पसरली. रडणाऱ्या मातांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्या आपल्या मुलांच्या मृतदेहाला मिठी मारत होत्या. आपली मुलं या जगात नाही यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. या सात मुलांमध्ये ६ वर्षांचा कान्हा आणि त्याची १२ वर्षांची बहीण मीना यांचा समावेश होता.
कान्हाच्या आईला आपल्या दोन्ही मुलांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. "मला दोन मुलं होती... एक मुलगा आणि एक मुलगी. माझी दोन्ही मुलं गेली. आता घर रिकामं झालं आहे... देवाने मला घेऊन जायला हवं होतं आणि मुलांना वाचवायला हवं होतं..." अशी आई सतत म्हणत आहे. शाळेतील दुर्घटनेत तिने दोन्ही मुलं गमावली.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेची इमारत आधीच खूप जुनी झाली होती. अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा लोकांचा संताप उफाळून आला. गुराडी चौक आणि एसआरजी रुग्णालयाबाहेर मोठा निषेध करण्यात आला. पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. याच दरम्यान, एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला.