‘आई, मला शेवटचं पाहून घे, कदाचित...’, १६९ भारतीयांना वाचवण्यास निघालेल्या महिला वैमानिकाने केला फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:47 IST2026-03-11T19:46:20+5:302026-03-11T19:47:31+5:30
Iran War: युद्धामुळे आखातामधील आबू धाबी, दुबई या प्रमुख शहरांसह इतर ठिकाणी हजारो भारतीय नागरिक अडकून पडले होते. या नागरिकांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसने पाठवलेल्या विशेष विमानातील महिला वैमानिक दीपिका अधाना हिने दाखवलेलं साहस आणि जबाबदारीची चर्चा आता होत आहे.

‘आई, मला शेवटचं पाहून घे, कदाचित...’, १६९ भारतीयांना वाचवण्यास निघालेल्या महिला वैमानिकाने केला फोन
इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये कमालीची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अचानक सुरू झालेल्या युद्धामुळे आखातामधील आबू धाबी, दुबई या प्रमुख शहरांसह इतर ठिकाणी हजारो भारतीय नागरिक अडकून पडले होते. या नागरिकांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसने पाठवलेल्या विशेष विमानातील महिला वैमानिक दीपिका अधाना हिने दाखवलेलं साहस आणि जबाबदारीची चर्चा आता होत आहे. हरयाणामधील फरिदाबाद येथील रहिवासी असलेल्या दीपिका हिच्यासोबत विमानात असलेला संपूर्ण कर्मचारी वर्ग हा महिलांचा होता. या सर्वांनी मिळून १६९ भारतीय नागरिकांना संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात सुखरूपपणे परत आणले होते.
युद्धक्षेत्र बनलेल्या आखातामधून प्रवाशांना आणण्याची जबाबदारी दीपिका अधाना हिच्यावर सोपवण्यात आली तेव्हा तिने सर्वात आधी कुटुंबीयांशी संवाद साधला. तसेच आई आणि काका मला शेवटचं बघून घ्या. तिथली परिस्थिती पाहता कदाचित मी पुन्हा दिसणार नाही. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिला तिच्या कर्तव्यापासून रोखलं नाही. उलट हिमतीने आणि जबाबदारीने काम करण्यासाठी तिला प्रेरित केलं.
दीपिका सांगते की, ६ मार्च रोजी मला अचानक संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याची सूचना मिळाली होती. खरंतर त्या विमानामध्ये आधी माझी मैत्रिण जाणार होती. मात्र उड्डाणापूर्वी दोन तास आधी मला या मोहिमेवर जाण्याबाबत समजले. त्यानंतर मी त्वरित तयार होऊन मी माझ्या टीमसह निघाले. या बचाव मोहिमेवर निघालेल्या विमानामध्ये एकूण सहा महिलांचा समावेश होता. त्यात कॅप्टन जसविंदर कौर, वैमानिक दीपिका अधाना आणि इतर चार महिला क्रू सदस्यांचा समावेश होता.
दुपारी दोन वाजता ते रास अल खैमाह विमानतळावर सुखरूपरीत्या उतरले. तिथे रोजच्या पेक्षा गर्दी कमी होती. मात्र तिथे कुठलं गडबड आणि गोंधळाचं वातावरण नव्हतं. तासाभराच्या कालावधीत विमानामध्ये १६९ प्रवाशांना बसवण्यात आले. त्यानंतर साडे तीन वाजता विमानाने तिथून उड्डाण केले. यादरम्यान, एकदा विमानाचा एटीसीसोबत असलेला संपर्क तुटला. त्यामुळे काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं. मात्र अल्पावधीतच संपर्क प्रस्थापित झाला आणि सुखरूपपणे वाटचाल करत हे विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.