ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 13:31 IST2024-10-21T13:31:05+5:302024-10-21T13:31:56+5:30
भाजपा आमदाराच्या भावाने आणि काही लोकांनी रुग्णालयात घुसून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये भाजपा आमदाराच्या भावाने आणि काही लोकांनी रुग्णालयात घुसून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदारांच्या माणसांनी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि केबिनमधून बाहेर काढलं. यावेळी रुग्णालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मथुरेच्या मांट विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार राजेश चौधरी यांच्या भावाने आणि काही लोकांनी डीएस हॉस्पिटलमध्ये घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली. मारहाणीची ही घटना रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भाजपा आमदाराच्या आईला महोली रोडवरील डीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भाजपा आमदाराच्या भावाने आणखी दोन-तीन लोकांना सोबत घेऊन आयसीयूमध्ये रेकॉर्डिंग सुरू केलं. कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने संतप्त झालेल्या आमदारांचे भाऊ संजय, दीपू आणि अन्य दोन-तीन जणांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्कांनी मारहाण करण्यात आली.
आमदार राजेश चौधरी यांनी फोनवर सांगितलं की, आईची तब्येत खराब आहे. त्यांच्या कुटुंबीयांना कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. त्याचवेळी डीएस हॉस्पिटलचे संचालक डॉ.ललित वार्ष्णेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदाराच्या आईची तब्येत बरी नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आयसीयूमध्ये व्हिडिओग्राफी आणि रेकॉर्डिंग करण्यास मनाई आहे, कारण संसर्ग पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मनाई केली होती. त्यावर आमदाराचा भाऊ संजय, दीपू आणि लोकप्रतिनिधीने कायदा हातात घेऊन हल्ला केला.