पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:58 IST2026-04-20T13:58:19+5:302026-04-20T13:58:59+5:30
West Bengal Assembly Elections: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी मतदानापूर्वी राज्यातील मतदार यादीत सुमारे ७ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या वाढीव मतदारसंख्येमुळे राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी आयोगाने या मतदारांचे सखोल तपशील जाहीर केलेले नाहीत.
सात लाख नवीन मतदारांपैकी सुमारे ३.२२ लाख मतदार पहिल्या टप्प्यात आपला मतदानाचा हक्क बजावतील. उर्वरित ३.८८ लाख मतदार दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी पात्र आहेत. या नवीन नोंदणीमुळे राज्यातील एकूण मतदारांची संख्या आता ६ कोटी ८२ लाख ५१ हजार ८ इतकी झाली आहे.
बंगालमधील सत्तासंघर्ष पाहता, या सात लाख नवीन मतदारांचा कल कोणाकडे असेल, यावर सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेषतः तरुणांची आणि महिलांची संख्या किती आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराची दिशा अधिक स्पष्ट होऊ शकते.
सविस्तर माहितीअभावी निर्माण झाला संभ्रम
आयोगाने एकूण आकडेवारी जाहीर केली असली, तरी यामध्ये १८ वर्षे पूर्ण झालेले प्रथमच मतदान करणारे किती आहेत, याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. तसेच, नवीन मतदार नोंदणी अर्ज किती प्राप्त झाले होते व त्यापैकी किती अर्ज फेटाळण्यात आले, याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही. यावर निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की, "नियम व निकषांनुसार एकूण आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सविस्तर माहिती आवश्यकतेनुसार ती नंतर सामायिक केली जाऊ शकते."