Nahid Rana BAN vs NZ: बांगलादेशचा वेगवान गोलंदाज नाहिद राणाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धमाका केला. त्याने एकहाती अर्ध्या किवी संघाला तंबूत धाडले. त्याच्या या धमाक्यामुळे ढाका येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला २०० धावांचा टप्पाही गाठता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ ५० षटकेही पूर्ण खेळू शकला नाही. त्यांनी ४८.४ षटकांत सर्वबाद केवळ १९८ धावा केल्या.
नाहिद राणाचा भेदक मारा!
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, बांगलादेशचा २३ वर्षीय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज, नाहिद राणाने न्यूझीलंडला २०० धावांच्या आत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या १० षटकात अतिशय कंजुष गोलंदाजी केली आणि तब्बल पाच बळीही घेतले. त्याने एकट्याने किवींच्या १० बळींपैकी निम्मे बळी घेतले. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरा सर्वोत्तम स्पेल टाकला. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाहिद राणाने १० षटकांत ३२ धावा देऊन ५ बळी घेतले.
४० दिवसांच्या कालावधीत दुसऱ्यांदा अशी कामगिरी
४० दिवसांच्या कालावधीत नाहिद राणाने दुसऱ्यांदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच बळी घेण्याची कामगिरी केली. त्याने सर्वप्रथम मिरपूरमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ५ बळी घेतले होते. त्यावेळी नाहिद राणाने २४ धावा देऊन ५ बळी घेतले होते. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील ५ बळींमुळे नाहिद राणाच्या एकदिवसीय बळींची संख्या आता १० झाली आहे. हा त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १०वा सामना होता. न्यूझीलंडविरुद्ध नाहिद राणाने बाद केलेल्या पाच फलंदाजांमध्ये हेन्री निकल्स, विल यंग, मोहम्मद अब्बास, डीन फॉक्सक्रॉफ्ट आणि जेडन लिंक्स यांचा समावेश होता. न्यूझीलंडकडून निक केलीने सर्वाधिक ८३ धावा केल्या.
बांगलादेशला मालिका बरोबरीत आणण्याची संधी
न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. न्यूझीलंडने पहिला सामना २६ धावांनी जिंकला. मात्र, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय पुनरागमन केले आहे. त्यामुळे त्यांनी मालिका बरोबरीत आणण्याची संधी आहे.