हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:23 IST2025-11-13T14:21:45+5:302025-11-13T14:23:11+5:30
वडिलांनी २२ दिवसांपूर्वीच मुलाला वाढदिवसाला बुलेट भेट दिली होती.

हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
लखनौच्या आशियाना परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. हसतं खेळतं घर अपघातामुळे उद्ध्वस्त झालं आहे. बुलेट आणि खासगी बसच्या धडकेत अकरावीचा विद्यार्थी वैभव झा (१७) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र शाश्वत गंभीर जखमी झाला. सकाळी ७:१५ च्या सुमारास वैभव त्याच्या छोट्या बहिणीला शाळेत सोडून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. वैभव हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांनी त्याला २२ दिवसांपूर्वीच त्याच्या वाढदिवसाला बुलेट भेट दिली होती. आज त्याच बुलेटमुळे त्याने आपला जीव गमावला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीला शाळेत सोडल्यानंतर वैभव त्याच्या बुलेटने पुढे जात असताना एका खासगी बसने रिव्हर्स घेतला. यामुळे बुलेटच्या मागच्या भागावर बस जोरात आदळली. यामुळे वैभव बसखाली आला. स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत वैभवचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचा मित्र शाश्वत रस्त्यावर वेदनेने तडफडत होता. शाश्वतने हेल्मेट घातल्यामुळे त्याचा जीव वाचला.
अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु एका ऑटो चालकाच्या सतर्कतेमुळे त्याला काही अंतरावर लोकांनी बस चालकाला पकडलं. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. आशियाना पोलीस घटनास्थळी पोहोचले, जखमीला रुग्णालयात पाठवलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
वैभवच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वडील संतोष कुमार यांनी त्याला चांगले गुण मिळाल्यास बुलेट गिफ्ट देण्याचं आश्वासन दिलं होतं. गेल्या महिन्यात निकालानंतर एक बुलेट खरेदी केली होती. वडिलांनी वाढदिवशी म्हणजेच २२ दिवसांपूर्वी गिफ्ट दिली होती. कुटुंबातील सदस्यांच्या मते, वैभव क्वचितच बुलेट चालवत असे. तो अल्पवयीन होता, म्हणून त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. त्याच्या कुटुंबाने त्याला सुरक्षिततेसाठी हेल्मेट देखील दिले होते, मात्र आता अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.