Rohini Acharya : "RJD ची सूत्र घुसखोरांच्या हाती..."; रोहिणी आचार्य यांचा हल्लाबोल; तेजस्वी यादव निशाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:46 IST2026-01-25T11:45:39+5:302026-01-25T11:46:06+5:30
Lalu Prasad Yadav And Rohini Acharya : राष्ट्रीय जनता दल (RJD) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक मोठी पोस्ट केली आहे.

Rohini Acharya : "RJD ची सूत्र घुसखोरांच्या हाती..."; रोहिणी आचार्य यांचा हल्लाबोल; तेजस्वी यादव निशाण्यावर
राष्ट्रीय जनता दल (RJD) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक मोठी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे भाऊ तेजस्वी यादव आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, पक्ष नेतृत्वातील बदलाच्या चर्चेवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
रोहिणी आचार्य यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, लालू प्रसाद यादव यांची खरी राजकीय विचारधारा आणि त्यांच्या सामाजिक न्यायाच्या लढाईला उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान पक्षाच्या आतूनच सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे की, जो खऱ्या अर्थाने 'लालूवादी' असेल, तो पक्षाच्या सध्याच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या लोकांना प्रश्न विचारेल आणि लालूवाद कमकुवत करणाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेविरुद्ध आवाज उठवेल.
जो सही मायनों में लालूवादी होगा, जिस किसी ने भी लालू जी के द्वारा, हाशिए पर खड़ी आबादी - वंचितों के हितों के लिए मजबूती से लड़ने वाली, खड़ी की गयी पार्टी के लिए निःस्वार्थ भाव से संघर्ष किया होगा, जिस किसी को भी लालू जी के द्वारा सामाजिक - आर्थिक न्याय के लिए किए गए सतत संघर्ष…
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) January 25, 2026
"पक्षाची खरी सूत्रं घुसखोरांच्या हाती"
रोहिणी यांनी असा दावा केला आहे की, पक्षाच्या सध्याच्या स्थितीला असे लोक जबाबदार आहेत ज्यांना "फॅसिस्ट विरोधकांनी पाठवलेले घुसखोर" म्हटलं जाऊ शकतं. रोहिणी यांनी लिहिलं की, आज जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या पक्षाची खरी सूत्रं त्या घुसखोरांच्या हाती आहेत, ज्यांना लालूवाद नष्ट करण्याच्या मोहिमेवर पाठवण्यात आलं आहे. असे लोक त्यांच्या उद्देशात बऱ्याच अंशी यशस्वीही होत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.
"पक्षाचं सध्याचं नेतृत्व प्रश्नांपासून पळ काढतं"
रोहिणी यांनी आपल्या पोस्टमध्ये नेतृत्वावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, पक्षाचं सध्याचं नेतृत्व प्रश्नांपासून पळ काढतं, उत्तरं देण्याचं टाळतं आणि तार्किक उत्तरं देण्याऐवजी संभ्रम पसरवतात. 'लालूवादा'बद्दल बोलणाऱ्यांशी अभद्र आणि अमर्याद वर्तन केलं जातं. नेतृत्वाला स्वतःच्या वागणुकीचा विचार करावा लागेल. जर नेतृत्व गप्प राहिलं, तर कट रचणाऱ्यांशी त्यांचे संगनमत असल्याचे आपोआप सिद्ध होईल.
RJD च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी आलेल्या रोहिणी आचार्य यांच्या या पोस्टमुळे पक्षांतर्गत असंतोष आणि कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या काही काळापासून पक्षाचं नेतृत्व, दिशा आणि अजेंडा याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि रोहिणी यांच्या या विधानामुळे ही चर्चा आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.