Video - "डीएम अंकल, प्लीज रस्ता बनवून द्या..."; चिमुकलीची साद, अधिकारी आले थेट घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:23 IST2026-05-06T15:19:12+5:302026-05-06T15:23:42+5:30
उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथील एका लहान मुलीच्या निरागस आवाजाने संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा हा आवाज बदलाचं कारण ठरला.

Video - "डीएम अंकल, प्लीज रस्ता बनवून द्या..."; चिमुकलीची साद, अधिकारी आले थेट घरी
उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथील एका लहान मुलीच्या निरागस आवाजाने संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा हा आवाज बदलाचं कारण ठरला. ही गोष्ट आहे पहिलीत शिकणाऱ्या चिमुकल्या मानवी सिंहची, जिने आपल्या घरासमोरील खराब रस्त्याला कंटाळून एक व्हिडीओ बनवला होता, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ती अत्यंत निरागसपणे म्हणतेय- "डीएम अंकल, तुम्ही खूप चांगले आहात... आमचा रस्ता सुद्धा बनवून द्या ना."
ही एका लहान मुलीची विनंती होती, ज्यातून तिची रोजची अडचण स्पष्टपणे दिसत होती. घराबाहेर साचलेले पाणी आणि खडबडीत रस्ता, जिथून चालणं तिच्यासाठी कठीण झालं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच लोकांनी तो मोठ्या प्रमाणात शेअर केला. कमेंट्समध्ये मुलीच्या धाडसाचं आणि निरागसतेचं कौतुक होऊ लागलं आणि अखेर हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला.
लखीमपुर डीएम से मासूम बच्ची की गुहार। हेलो डीएम अंकल आप बहुत अच्छे है, आने जाने में दिक्कत हो रही हमारी सड़क बनवा दीजिएpic.twitter.com/D050bibMfk
— Srishti Vishwakarma (@Srishtivishwak4) May 5, 2026
प्रशासनानेही यावर तात्काळ पाऊल उचललं. हा व्हिडिओ लखीमपुर खीरीचे जिल्हाधिकारी अंजनी कुमार सिंह यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी त्वरित ॲक्शन घेण्याचा निर्णय घेतला. काही वेळातच जिल्हाधिकारी स्वतः अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह मानवीच्या घरी पोहोचले. अचानक जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या दारात पाहून मानवी आणि तिच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही ओसंडून वाहत होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ मानवीची भेटच घेतली नाही, तर तिचं म्हणणं गांभीर्याने ऐकून घेतलं. ते मानवीला सोबत घेऊन त्या खराब रस्त्यापर्यंत गेले, जिथे तिला त्रास होत होता. तिथे जाऊन त्यांनी स्वतः परिस्थितीची पाहणी केली. रस्त्यावर साचलेलं पाणी आणि खचलेला रस्ता पाहून त्यांनी तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. मानवीसह संपूर्ण परिसरातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मानवीच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं. त्यांनी तिला बिस्किटं आणि मिठाई दिली आणि तिला मन लावून अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केलं.
ये है सोशल मीडिया की ताक़त 🔥
सुबह सुबह इस बच्ची की वीडियो वायरल हुई. बच्ची DM अंकल से सड़क बनवाने की गुहार लगा रही थी.
शाम तक लखीमपुर DM बच्ची को ढूँढते हुए घर पहुंच गए. फिर बच्ची से मिलकर आश्वासन दिया कि सड़क जल्द बन जायेगी. pic.twitter.com/J20xSYtVVc— Mayank Verma 🇮🇳 (@imayankindian) May 5, 2026
याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी अंजनी कुमार सिंह म्हणाले की, "हे प्रकरण शहराच्या बाहेरील परिसरातील आहे. मला सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडीओ मिळाला, त्यानंतर मी स्वतः तिथे जाऊन पाहणी केली. त्या चिमुरडीची भेट घेतली. त्या वस्तीत सध्या काही पायाभूत सुविधांची कमतरता आहे. व्हिडिओमध्ये दिसलेला रस्ता पावसामुळे दबला असून तिथे पाणी साचले आहे. आम्ही तातडीने तिथे रस्ता आणि नाल्याची व्यवस्था करत आहोत."
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहनही केलं. ते म्हणाले की, "जेव्हा तुम्ही प्लॉट खरेदी करता किंवा घर बांधता, तेव्हा तिथे रस्ता, वीज आणि उद्यानांची सोय आहे का हे तपासून पाहा. लेआउट पास न करता केलेली प्लॉटिंग अवैध असतं आणि अशा भागात सुविधांची वानवा असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. मुख्य सुविधा पुरवण्यासाठी आमचं प्रशासन कटिबद्ध आहे आणि त्या मुलीच्या विनंतीवर त्वरित कारवाई सुरू झाली आहे."