बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 07:51 IST2025-10-26T07:49:59+5:302025-10-26T07:51:13+5:30
Kurnool Bus Fire Accident : एका खासगी बसला भीषण आग लागल्याने २० जणांचा मृत्यू झाला. बसची एका बाईकला धडक झाल्याने अपघात झाला.

बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे शुक्रवारी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. एका खासगी बसला भीषण आग लागल्याने २० जणांचा मृत्यू झाला. बसची एका बाईकला धडक झाल्याने अपघात झाला. धडक दिल्यानंतर आग लागली. पोलिसांनी सांगितलं की, कुर्नूल बस आगीच्या दुर्घटनेत सहभागी असलेल्या बाईकचा आधीच अपघातात झाला होता, ज्यामध्ये रायडरचा जागीच मृत्यू झाला.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कुर्नूल जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) विक्रांत पाटील यांनी सांगितलं की, बाईक चालवणाऱ्या शिव शंकर नावाच्या व्यक्तीचा अपघातामुळे जागीच मृत्यू झाला. काही क्षणातच कर्नाटकची राजधानी बंगळुरूला जाणाऱ्या एका खासगी बसने बाईकला धडक दिली. बसने धडक दिल्यानंतर आग लागली. रायडरचा मृत्यू झाला, पण मागे बसलेली व्यक्ती जखमी झाली.
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
एक नव्हे तर दोन अपघात
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीने नेमकं काय घडलं हे सांगितलं. हे दोन वेगवेगळे अपघात असल्याचं समोर आलं. पहिला अपघातात बाईक रस्त्यावरून घसरली आणि डिव्हायडरला धडकली आणि दुसऱ्या अपघात स्लीपर बसची रस्त्यावर पडलेल्या बाईकला धडक बसली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव शंकर शुक्रवारी लक्ष्मीपुरम गावातून एरी स्वामीला तुग्गली गावात सोडण्यासाठी त्याच्या बाईकवरून निघाला होता.
अपघातात २० जणांचा मृत्यू
घटनेपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये पहाटे २:२४ वाजता किआ कार शोरूमजवळील एचपी पेट्रोल पंपावर दोघे जण पेट्रोल भरत असल्याचं दिसून आलं आहे. काही मिनिटांनंतर पावसामुळे चिखल आणि रस्ता ओला असल्याने शिव शंकरची बाईक घसरली. यानंतरच बसची बाईकला धडक बसली आणि आग लागली. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला.