बहिणीचा सांगाडा बँकेत नेल्याचे प्रकरणी तपासात 'बँकेचीच चूक' असल्याचे निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 09:05 IST2026-05-01T09:05:29+5:302026-05-01T09:05:59+5:30

या घटनेवरून ओडिशामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जितू मुंडा यांची भेट घेतली.

Investigation into sister skeleton being taken to bank finds it was 'bank's fault' | बहिणीचा सांगाडा बँकेत नेल्याचे प्रकरणी तपासात 'बँकेचीच चूक' असल्याचे निष्पन्न

बहिणीचा सांगाडा बँकेत नेल्याचे प्रकरणी तपासात 'बँकेचीच चूक' असल्याचे निष्पन्न

केओंझार (ओडिशा) : बहिणीचा मृत्यू झाल्याचा पुरावा म्हणून तिचा सांगाडा घेऊन बँकेत पोहोचलेल्या एका आदिवासी व्यक्तीच्या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला सहकार्य न केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये 'बँकेचीच चूक' असल्याचे संकेत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी दिले आहेत.

उत्तर विभागाचे आरडीसी संग्राम केशरी महापात्रा यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसह बँकेला भेट दिली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितले की, जितू मुंडा हे सकाळी ११:२६ ते ११:५८ या वेळेत बँकेत होते. त्यांनी दोनदा शाखा व्यवस्थापकांची भेट घेतली, मात्र समाधान न झाल्याने ते संतप्त होऊन बाहेर पडले.

‘बँक कर्मचाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे होते’

सहकार्याचा अभाव : महापात्रा यांच्या मते, जितू मुंडा हे निरक्षर नसले तरी त्यांना बँकिंग प्रक्रियेची माहिती नव्हती. अशा वेळी त्यांना सहकार्य करणे आवश्यक होते, जे बँकेने केले नाही.

कारवाईचे संकेत : प्राथमिक चौकशीत बँक दोषी आढळल्याने जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, महापात्रा यांनी स्पष्ट केले आहे.

राजकारण तापले 
या घटनेवरून ओडिशामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जितू मुंडा यांची भेट घेतली. त्यांनी १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे, तर बीजू जनता दलाने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली.

शासकीय मदत 
दरम्यान, ओडिशा सरकारने जितू मुंडा यांना ३० हजार रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे. तसेच त्यांच्या बहिणीच्या खात्यातील अडकलेली रक्कमही आता त्यांना सुपूर्द करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Investigation into sister skeleton being taken to bank finds it was 'bank's fault'