पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तारीख ठरली; पीएम मोदींशी ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर होणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 14:28 IST2025-11-28T14:27:43+5:302025-11-28T14:28:14+5:30
India-Russia: रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत.

पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तारीख ठरली; पीएम मोदींशी ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर होणार चर्चा
India-Russia: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 4 आणि 5 डिसेंबर रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावर हा दौरा आयोजित केला असून, हा दौरा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि परिणामकारक मानला जात आहे. या दौऱ्यात ऊर्जा, संरक्षण, व्यापार, भू-राजनैतिक विषय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सविस्तर चर्चा होणार आहे.
रशियन सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत रशियाचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव यांनी सांगितले की, भारत आणि रशिया या दौऱ्याची तयारी मोठ्या उत्साहाने करत आहेत. ही भेट अत्यंत सार्थक आणि भव्य ठरणार आहे. उशाकोव यांनी हेही स्पष्ट केले की, मोदी आणि पुतिन यांचा हा संवाद गेल्या वर्षी झालेल्या करारानुसार आहे, ज्या अंतर्गत दोन्ही नेते दरवर्षी भेटून द्विपक्षीय तसेच जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
पुतिन यांच्या या भेटीत खालील मुद्दे चर्चेत येणार आहेत:
रशियन तेल खरेदी
संरक्षण सहकार्य व तंत्रज्ञान
द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठी नवे करार
आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरील समन्वय
अमेरिका-रशिया संबंधांतील तणाव आणि अमेरिकेकडून भारतावरील तेल खरेदीबाबतचा दबाव पाहता हा दौरा अधिकच महत्त्वाचा ठरणार आहे.