गुजरातमध्ये रंगली संघाची इफ्तार पार्टी

By Admin | Updated: July 29, 2014 15:29 IST2014-07-29T15:22:51+5:302014-07-29T15:29:05+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदा थेट गुजरातमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Iftar Party of Rangli Sangh in Gujarat | गुजरातमध्ये रंगली संघाची इफ्तार पार्टी

गुजरातमध्ये रंगली संघाची इफ्तार पार्टी

ऑनलाइन टीम

अहमदाबाद, दि. २९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुस्लीमांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले नसले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र यंदा थेट गुजरातमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हिंदू - मुस्लीममध्ये एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी संघाच्या मुस्लीम मंचातर्फे या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक के.एस. सुदर्शन यांनी २००२ मध्ये मुस्लीम राष्ट्रीय मंचाची स्थापना केली होती. याच मंचाने यंदा गुजरातमध्ये एक दोन नव्हे तर थेट सात शहरांमध्ये इफ्तारपार्टीचे आयोजन केले होते. वडोदरा, सुरत, अहमदाबाद, नवसारी अशा विविध भागांमध्ये ही इफ्तार पार्टी रंगली होती. विशेष म्हणजे इफ्तार पार्टीपासून चार हात लांब राहणा-या संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी या पार्टीला हजेरी लावली होती. वडोदरा झालेल्या इफ्तार पार्टीत भाजपचे वरिष्ठ नेते जयंती बरोट आणि संघाचे ज्येष्ठ नेते व मुस्लीम मंचाचे संरक्षक इंद्रेश कुमारही उपस्थित होते. इंद्रेश कुमार हे समझौता एक्सप्रेसमधील बाँबस्फोटामधील संशयित आहेत. 
मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे गनी कुरैशी म्हणाले, आम्ही आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सुमारे ८०० जण सहभागी झाले होते. अहमदाबाद येथील पार्टीत ४० मुस्लीम धार्मिक नेते आणि ३० मौलवी उपस्थित होते. तर मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफजल यांनी गुजरातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अन्य राज्यांमध्येही आमच्या मंचाने इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याचे आवर्जून सांगितले. 
हिंदू व मुस्लीमांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी मंचाने या पार्टीचे आयोजन केले होते. इंद्रेश कुमार हे आमच्या संघटनेचे प्रमुख आहेत असे अफजल यांनी सांगितले. मात्र संघाने या मंचाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. संघाचे प्रवक्ते प्रदीप जैन यांनीदेखील इफ्तार पार्टीचे वृ्त्त फेटाळून लावले आहे. 'संघाचा कोणताही नेता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मुस्लीम मंचाशी संबंधीत नसून आमचे नेते या पार्टीला गेलेच नव्हते असा दावाही जैन यांनी केला आहे. 

Web Title: Iftar Party of Rangli Sangh in Gujarat