उत्तर प्रदेशातील हापूर येथे मेरठ-बुलंदशहर महामार्गावर रात्री उशिरा झालेल्या एका दुर्दैवी अपघातात चार मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात वाहनाने दुचाकीवरून जाणाऱ्या पाच जणांना धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ताबडतोब जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, तिथे डॉक्टारांनी त्यांना मृत घोषित केले. हे सर्व जण एकाच दुचाकीवरून हाफीजपूर पोलिस स्टेशनच्या मुर्शिदपूर गावात स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेले होते, अशी माहिती आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कोतवाली नगर परिसरातील रफिकनगर मजिदपुरा येथील रहिवासी दानिश हा त्याच्या दोन मुली आणि इतर दोन मुलांसह बुधवारी संध्याकाळी दुचाकीवरून हाफीजपूर पोलिस स्टेशनच्या मुर्शिदपूर गावातील स्विमिंग पूलमध्ये पोहोण्यासाठी गेला होता. दरम्यान, बुधवारी रात्री १०:३० नंतर घरी परत येत असताना हाफिजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मेरठ-बुलंदशहर महामार्गावर पडावजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दानिश आणि त्याच्यासोबत असलेले चार मुले गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले पण तोपर्यंत दुचाकीस्वार दानिश आणि त्याच्या दोन मुलींसह सर्वांचा मृत्यू झाला.
हाफिजपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी आशिष पुंडिर यांनी सांगितले की, रफिक नगर येथील रहिवासी ३६ वर्षीय दानिश आणि त्याच्या पाच वर्षीय समायरा, सहा वर्षीय माहिरा आणि आठ वर्षीय मुलगी समर तरताज आणि सरताजचा भाऊ वकीलची आठ वर्षीय मुलगी माहिम अशी या पाच जणांची ओळख पटली आहे. सीसीटीव्हीद्वारे पोलीस अज्ञात चालकाचा शोध घेत आहेत.