निसर्गाचा कोप आणि गॅसचा तुटवडा! नैनीतालमध्ये ८० हजार लोक अंधारात; पर्यटनाला बसला मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 10:43 IST2026-03-18T10:42:07+5:302026-03-18T10:43:09+5:30
आधी भीषण वादळ आणि गारपिटीने वीज व्यवस्था विस्कळीत केली आणि आता एलपीजी गॅसच्या संकटामुळे नैनीतालचे कंबरडे मोडले आहे.

निसर्गाचा कोप आणि गॅसचा तुटवडा! नैनीतालमध्ये ८० हजार लोक अंधारात; पर्यटनाला बसला मोठा फटका
डोंगरांची राणी आणि पर्यटकांचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या नैनीतालची झगमग सध्या पूर्णपणे मंदावली आहे. आधी भीषण वादळ आणि गारपिटीने वीज व्यवस्था विस्कळीत केली आणि आता एलपीजी गॅसच्या संकटामुळे या शहराचे कंबरडे मोडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून नैनीतालसह आसपासच्या परिसरातील सुमारे ८० हजार लोक अंधारात आणि उपासमारीच्या छायेत वावरत आहेत.
वादळाचा तडाखा आणि ४८ तास अंधार
भीषण वादळामुळे नैनीतालमधील अनेक जुनाट वृक्ष उन्मळून पडले, ज्यामुळे वीजवाहिन्यांचे प्रचंड नुकसान झाले. तब्बल ४८ तास संपूर्ण शहर अंधारात होते. याचा परिणाम केवळ घरातील लाइटवरच झाला नाही, तर पाणीपुरवठा आणि मोबाईल नेटवर्कही कोलमडले. हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये जनरेटरही निकामी ठरल्याने पर्यटकांचे प्रचंड हाल झाले. वीज विभागाला या नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचा फटका बसला आहे. कुमाऊं झोनचे मुख्य अभियंता राजेंद्र गुंज्याल यांनी युद्धपातळीवर काम करून पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
स्वयंपाकाच्या गॅससाठी वणवण
वीज पुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच आता एलपीजी गॅसच्या तुटवड्याने नवीन संकट उभे केले आहे. घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर्सचा पुरवठा विस्कळीत झाल्याने मल्लीताल परिसरातील अनेक रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खानावळींना टाळी लागली आहे. पर्यटन हंगाम तोंडावर असतानाच आलेल्या या संकटामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गॅसअभावी अनेक छोट्या व्यावसायिकांनी लाकडाचा वापर सुरू केला आहे, परंतु हे फार काळ टिकणारे नाही.
आंतरराष्ट्रीय तणावाचा फटका?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थिती आणि तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचा फटका केवळ नैनीताललाच नाही, तर रामनगर, मुक्तेश्वर आणि हल्द्वानी या भागांनाही बसला आहे. व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर तात्पुरती बंदी आल्याने हॉटेल उद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हॉटेल असोसिएशनची धावपळ
हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. जर लवकरच ही परिस्थिती सुधारली नाही, तर पर्यटन व्यवसायाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे निसर्गाचा कोप आणि दुसरीकडे इंधन संकट अशा कात्रीत सध्या नैनीताल अडकले आहे.