लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांबाबत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)ने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात, निवडणूक लढवणाऱ्यांपैकी १८ टक्के उमेदवारांवर फौजदारी खटले दाखल आहेत, तर २५ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. विशेष म्हणजे, २२ उमेदवार ‘अब्जाधीश’ असून त्यांच्याकडे १०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीचा वाढता आलेख
निवडणुकीत ३,९९२ उमेदवारांपैकी ७२२ (१८%) उमेदवारांनी स्वतःवर फौजदारी खटले असल्याची घोषणा केली आहे. यापैकी ४०४ (१०%) उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. २०२१ च्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे.
९८१ उमेदवार कोट्यधीश, २२ जणांकडे १०० कोटींहून अधिक मालमत्ता
विधानसभा निवडणुकीच्या मैदानात धनशक्तीचे मोठे प्रदर्शन पाहायला मिळत आहे. सुमारे ९८१ (२५%) उमेदवार कोट्यधीश आहेत. तर २२ उमेदवारांकडे १०० कोटींहून अधिक मालमत्ता आहे.
सरासरी संपत्ती : २०२१ मध्ये उमेदवारांची सरासरी संपत्ती १.७२ कोटी रुपये होती, जी २०२६ मध्ये वाढून ५.१७ कोटी रुपये झाली आहे.
कोट्यधीश उमेदवार : काँग्रेसचे ९६%, डीएमकेचे ९७%, अण्णाद्रमुकचे ९४% आणि भाजपचे ९४% उमेदवार कोट्यधीश आहेत.
शून्य संपत्ती : दरम्यान, मोहन कुमार एम यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांनी आपल्याकडे शून्य मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
शिक्षण आणि महिला प्रतिनिधित्व शिक्षण : ४६% उमेदवार पदवीधर किंवा त्याहून अधिक शिक्षित आहेत, तर ४३% उमेदवार ५ वी ते १२ वी दरम्यान शिकलेले आहेत. ९५ उमेदवार निरक्षर आहेत.
महिला प्रतिनिधित्व : राजकारणात महिलांच्या सहभागाबाबत अद्याप मोठी दरी असून, एकूण उमेदवारांपैकी केवळ ४४२ म्हणजे ११ टक्केच महिला रिंगणात आहेत.
Web Summary : Tamil Nadu elections see 18% of candidates with criminal cases and 25% millionaires, including 22 billionaires. Candidate average asset increased significantly. Women representation remains low at 11%.
Web Summary : तमिलनाडु चुनावों में 18% उम्मीदवार आपराधिक मामलों वाले और 25% करोड़पति हैं, जिनमें 22 अरबपति शामिल हैं। उम्मीदवारों की औसत संपत्ति में वृद्धि हुई है। महिलाओं का प्रतिनिधित्व 11% पर कम है।