कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:39 IST2025-07-02T11:32:18+5:302025-07-02T11:39:23+5:30
Covid Vaccine Side Effects Young Adults: गेल्या काही दिवसांपासून देशभरात तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्यांनी मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच हे संशोधन समोर आलं आहे.

कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती
AIIMS ICMR Report: गेल्या काही महिन्यांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. वाटेतून चालताना, व्यायाम करताना, मैदानात खेळताना, ऑफिसमध्ये काम करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अचानक वाढलेल्या हृदयविकाराच्या झटक्यांच्या प्रमाणाला कोरोनापासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेली लस कारणीभूत ठरत असल्याचे दावे केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआर आणि एम्स यांनी केलेल्या संशोधनामधून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. कोरोनाची साथ येऊन गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येण्याच्या वाढलेल्या घटनांमागे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देण्यात आलेल्या लसीचा कुठलाही संबंध नसल्याचे या संशोधनात म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं वाढलेलं प्रमाण आणि कोरोनावरील लसीकरणाचा कुठलाही संबध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आयसीएमआरने केलेल्या संशोधनामध्ये कोरोनावरील लस आणि हृदयविकार यांच्यामध्ये काही संबंध असल्याचे दिसून आलेले नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात दिल्ली एम्सकडून सध्या एक अध्ययन सुरू आहे. त्यामाध्यमातून तरुणांमध्ये वाढलेल्या अपमृत्यूंमागचं कारण शोधलं जात आहे. या संशोधनातून आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार हृदयविकाराचा झटका हे या मृत्यूंमागचं सर्वसाधारण कारण आहे. त्याशिवाय अनुवांशिक कारणं, जुने आजार हेसुद्धा मृत्यूंना कारणीभूत ठरत आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या अपमृत्यूंच्या प्रमाणामध्येही फार मोठा बदल झालेला नसल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.
तसेच कोरोनावरील लस आणि अपमृत्यू यांचा कुठलाही थेट संबंध दिसून आलेला नाही. बहुतांश मृत्यूंचं कारण हे बदललेली जीवनशैली, अनुवांशिक कारणं आणि आधीपासून असलेले आजार ही असल्याचेही समोर आले आहे. तसेच कोरोनावरील लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, त्यामुळे लोकांचा जीव वाचल्याचेही या संशोधनात म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्यांनी मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच हे संशोधन समोर आलं आहे. आता आयसीएमआर आणि एनसीडीसी यामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अभ्यास करत आहेत. सध्यातरी या संशोधनामध्ये बदलेली जीवनशैली आणि आधीपासून असलेल्या व्याधी हे मृत्यूमागचं कारण असल्याचं म्हटलं आहे.