Corona vaccine: देशातील लसटंचाई दूर करण्यासाठी नितीन गडकरींचा PM मोदींना 'दस नंबरी' मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 11:00 AM2021-05-19T11:00:55+5:302021-05-19T11:45:54+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. ( Nitin Gadkari)

Corona vaccine: Give licenses to 10 companies to manufacture Corona vaccines instead of one company said Central Minister Nitin Gadkari | Corona vaccine: देशातील लसटंचाई दूर करण्यासाठी नितीन गडकरींचा PM मोदींना 'दस नंबरी' मंत्र

Corona vaccine: देशातील लसटंचाई दूर करण्यासाठी नितीन गडकरींचा PM मोदींना 'दस नंबरी' मंत्र

Next

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठलेला असताना आता कोरोनातून बरे होणाऱ्यांचाही विक्रम झाला आहे. देशात प्रथमच चार लाखांहून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या ३ लाखांच्या आत नोंदविण्यात आली, तर चार लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ४ हजार ३२९ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे संसर्ग होणाऱ्या नव्या रुग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून घटत आहे. २ महिन्यांनी अडीच लाखांच्या जवळपास नवे रुग्ण नोंदविले आहेत. यापूर्वी २० एप्रिलला २ लाख ५९ हजार नवे रुग्ण नोंदविण्यात आले होते. लसीकरण कोरोनाला रोखण्याचा एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र भारतातील अनेक राज्यांमध्ये लसींचा सातत्याने तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. राज्यांनी अपुऱ्या लस पुरवठ्यावरुन केंद्रावर सातत्याने टीका केली आहे. याचदरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारला सल्ला दिला आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने समस्या निर्माण होत असेल, तर एका कंपनीला देण्याऐवजी १० आणखी कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्या. त्यांना देशात पुरवठा करु द्या आणि नंतर जास्त निर्मिती झाल्यास ते निर्यात करु शकतात. हे १५ ते २० दिवसात केले जाऊ शकते, असं मत नितीन गडकरी यांनी मांडले. 

गडकरी पुढे म्हणाले की, चंदनऐवजी डिझेल, इथेनॉल आणि बायोगॅस इंधन आणि विजेचा वापर केला गेला तर अंत्यसंस्कार करणे स्वस्त होईल असे गडकरी यांनी सांगितले. बिहार आणि उत्तर प्रदेशात अंत्यसंस्कारासाठी अधिक पैसे द्यावे लागत असल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात येत आहेत, असं नितीन गडकरी यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. पुढील संकट लक्षात घेता ऑक्सिजनसंदर्भात विदर्भाला आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. ऑक्सिजनअभावी कुणाचा जीव जाऊ नये यासाठी विदर्भात तालुका, नगरपरिषद तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. विविध संस्थांमधील वैज्ञानिक तसेच विद्यापीठांच्या कुलगुरूंशी त्यांनी मंगळवारी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कोरोनानंतर अनेकांना काळ्या बुरशीचा रोग होत आहे. त्यासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसिन-बी या इंजेक्शनचीही निर्मिती वर्ध्यात होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा-

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

सोमवार राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९, ६९९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.
 

Web Title: Corona vaccine: Give licenses to 10 companies to manufacture Corona vaccines instead of one company said Central Minister Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.