ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 13:09 IST2026-05-01T13:07:51+5:302026-05-01T13:09:59+5:30
Brij Bhushan Sharan Singh News: महिला कुस्तीपटूंच्या शोषणाच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपाचे दबंग नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे सध्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण
महिला कुस्तीपटूंच्या शोषणाच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपाचे दबंग नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे सध्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पक्षांतर करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चाही उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. जर पक्षाला आम्ही ओझं वाटत असलो तर पक्षाने आता आमची गरज नाही असे एकदा सांगावे, असे स्पष्टपणे ब्रजभूषण शरण सिंह यांनी सांगितले आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणामुळे ब्रिजभूषण सिंह भाजपात अस्वस्थ आहेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे ब्रिजभूषण सिंह अडचणीत आले होते. तसेच त्यांच्यावरील आरोपांमुळे भाजपाचीही कोंडी झाली होती. त्यामुळेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली होती. त्यांच्या मुलाने विजय मिळवला होता. मात्र पक्षाकडून बाजूला टाकण्यात येत असल्याने ब्रिजभूषण शरण सिंह नाराज आहेत.
आमची गरज नाही असे पक्षाने एकदा सांगावे, २०२७ मध्ये सांगावे, अन्यथा २०२९ मध्ये सांगावे. मग आमची उपयुक्तता आहे की नाही हे आम्ही दाखवून देऊ, असे आव्हान ब्रिजभूषण शरण सिंह यांनी पक्षाला दिले आहे. एकीकडे भाजपाबाबत वारंवार नाराजी व्यक्त करत असलेले ब्रजभूषण शरण सिंह हे अखिलेश यादव यांच्याबाबत मात्र सकारात्मकपणे बोलताना दिसत आहेत. तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख असलेल्या अखिलेश यादव यांनीही ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ब्रिजभूषण शरण सिंह हे कमळ सोडून सायकलीवर स्वार होण्याचा विचार तर करत नाही आहेत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह हे समाजवादी पक्षात येणार का, असे विचारले असता अखिलेश यादव यांनीही आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. अखिलेश यादव यांनी ब्रिजभूषण सिंह यांचा आपला नेता आणि गोंडाचे नेते असा उल्सेख केला. तेव्हापासून या चर्चांना अधिकच जोर आला आहे. ब्रिजभूषण सिंह यांचे समाजवादी पक्षाशी याआधीही संबंध राहिलेले आहेत. भाजपात कोंडी होऊ लागल्यानंतर ते याआधीही समाजवादी पक्षात गेले होते. तसेच २००९ ते २०१४ या काळात ते समाजवादी पक्षाचे खासदार राहिले होते. तर २०१४ मध्ये ते पुन्हा भाजपात आले होते. मात्र त्यांचे मुलायम सिंह यांच्या कुटुंबीयांशी असलेले चांगले संबंध कायम राहिले होते.