जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. भारत यावर्षी सप्टेंबर महिन्यात 'ब्रिक्स' शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. येत्या १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या या महापरिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांनी आपल्या या दौऱ्याबाबत नवी दिल्लीला अधिकृतपणे कळवले आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था 'TASS'ने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
क्रेमलिनचे आंतरराष्ट्रीय व्यवहार सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी स्पष्ट केले आहे की, राष्ट्राध्यक्ष पुतिन १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होतील. विशेष म्हणजे, या दौऱ्यादरम्यान पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एक स्वतंत्र द्विपक्षीय बैठकही होणार आहे. पुतिन यांचा एका वर्षाच्या आतील हा दुसरा भारत दौरा ठरणार आहे.
गेल्याच वर्षी पुतिन आले होते भारत दौऱ्यावर
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारताचा दौरा केला होता. त्यानंतर आता अवघ्या काही महिन्यांतच ते पुन्हा भारतात येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनीही नवी दिल्लीत ब्रिक्स सदस्य देशांच्या दोन दिवसीय बैठकीत भाग घेतला होता. सप्टेंबरमधील या मुख्य परिषदेपूर्वी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे 'एससीओ' परिषद होणार असून, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
तब्बल ७ वर्षांनंतर जिनपिंग पाऊल ठेवणार भारताच्या भूमीवर!
या संपूर्ण परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा भारत दौरा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक मानला जात आहे. जिनपिंग तब्बल ७ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी त्यांनी २०१९ मध्ये भारताला भेट दिली होती, तेव्हा ते चेन्नईजवळील मामल्लापुरम येथे आले होते. त्यानंतर भारत आणि चीनमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जात आहे. भारत यावर्षी ब्रिक्सचे अध्यक्षपद सांभाळत असल्याने दिल्लीत या नेत्यांचे जंगी स्वागत होणार आहे.
ब्रिक्स आता ११ देशांची महाशक्ती; जागतिक अर्थव्यवस्थेवर पकड
'ब्रिक्स' हा जगातील वेगाने वाढणाऱ्या ११ देशांचा एक अत्यंत शक्तिशाली समूह आहे, ज्याचे नेतृत्व भारताकडे आहे. सुरुवातीला या समूहात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे ५ देश होते. मात्र, २०२४ मध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण आणि युएई हे ४ नवीन देश यात सामील झाले. त्यानंतर २०२५ मध्ये इंडोनेशियानेही या समूहाचे सदस्यत्व घेतले.
सध्या हा 'ब्रिक्स' समूह जगातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ४९.५ टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. इतकेच नाही तर जगाच्या एकूण कमाईत म्हणजेच जीडीपीमध्ये या ११ देशांचा वाटा तब्बल ४० टक्के आहे, तर जागतिक व्यापारात २६ टक्के हिस्सा या देशांचा आहे. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या या परिषदेकडे आणि मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या त्रिकुटाकडे संपूर्ण जगाचे डोळे लागून राहिले आहेत.
Web Summary : India hosts the BRICS summit in September, with Putin and Xi Jinping expected. Xi's visit is his first in 7 years, marking a significant diplomatic event amidst border tensions. The expanded BRICS represents 49.5% of the world's population.
Web Summary : भारत सितंबर में ब्रिक्स शिखर सम्मेलन की मेजबानी करेगा, जिसमें पुतिन और शी जिनपिंग के आने की उम्मीद है। सीमा तनाव के बीच शी की 7 साल में यह पहली यात्रा एक महत्वपूर्ण राजनयिक घटना है। विस्तारित ब्रिक्स दुनिया की 49.5% आबादी का प्रतिनिधित्व करता है।