कापून ठेवलेले कलिंगड ठरतेय विष?; मुंबईनंतर छत्तीसगडमध्ये मुलाचा मृत्यू, चौघांची मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 14:54 IST2026-05-13T14:45:24+5:302026-05-13T14:54:59+5:30
छत्तीसगडमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर एका मुलाचा मृत्यू झाला असून चौघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कापून ठेवलेले कलिंगड ठरतेय विष?; मुंबईनंतर छत्तीसगडमध्ये मुलाचा मृत्यू, चौघांची मृत्यूशी झुंज
Chhattisgarh Watermelon Case: छत्तीसगडमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटायला आलेल्या मुलांवर काळाने घाला घातला आहे. छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात कलिंगड आणि त्यानंतर चिकन खाल्यामुळे पाच मुलांना भीषण विषबाधा झाली. यामध्ये १५ वर्षांच्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य चार जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून मुंबईतला पायधुनी प्रकरणाची आठवण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोडी दलहा येथील १५ वर्षीय अखिलेश धीवर आपल्या नातेवाईकांसह मामाच्या गावी एका लग्नासाठी आला होता. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास मुलांनी घरात ठेवलेले कलिंगड खाल्ले. त्यानंतर रात्री त्यांनी चिकनही खाल्ले. मात्र, दोनच तासांत मुलांचा वेदनेने ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागल्या. अखिलेशसह श्री धीवर, पिंटू धीवर, नरेंद्र आणि हितेश धीवर या सर्वांना अचानक उलट्या, जुलाब आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवले, पण दुर्दैवाने अखिलेशने वाटेतच प्राण सोडले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सकाळी कापलेले कलिंगड ठरले 'विष'?
जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांनी जे कलिंगड खाल्ले ते सकाळीच कापून ठेवण्यात आले होते. अनेक तास कापून ठेवलेल्या फळांमध्ये विषाणूंचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. "प्राथमिक दृष्ट्या हे प्रकरण फूड पॉयझनिंगचे दिसते. मुलांनी सकाळी कापलेले कलिंगड अनेक तासांनंतर खाल्ले आणि त्यानंतर इतर पदार्थही खाल्ले, ज्यामुळे संसर्ग बळावला असावा," असे डॉक्टरांनी सांगितले. प्रशासनाने व्हिसेरा नमुने आणि कलिंगड लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत.
मुंबईतील घटनेची आठवण झाली ताजी
छत्तीसगडमधील या घटनेने काही काळापूर्वी मुंबईत घडलेल्या अशाच एका धक्कादायक घटनेची आठवण करून दिली आहे. मुंबईतही एका कुटुंबाने कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांचा मृत्यू झाला. मात्र बऱ्याच दिवसांनी त्यांच्या शरीरात उंदीर मारण्याचे औषध सापडल्याने खळबळ उडाली.