दिल्लीत भाजपचं धक्कातंत्र: गौतम गंभीरचा पत्ता कट करून अक्षय कुमार लोकसभेच्या मैदानात?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 01:10 PM2024-02-29T13:10:21+5:302024-02-29T13:10:56+5:30

दिल्लीतील ७ जागांसाठी ज्या उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे त्यामध्ये दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि बांसुरी स्वराज यांच्याही नावाचा समावेश आहे.

BJP lok sabha candidates in Delhi Gautam Gambhir Akshay Kumar updates | दिल्लीत भाजपचं धक्कातंत्र: गौतम गंभीरचा पत्ता कट करून अक्षय कुमार लोकसभेच्या मैदानात?

दिल्लीत भाजपचं धक्कातंत्र: गौतम गंभीरचा पत्ता कट करून अक्षय कुमार लोकसभेच्या मैदानात?

Lok Sabha Election ( Marathi News ) : बऱ्याच दिवसांच्या खलबतांनंतर काही दिवसांपूर्वी राजधानी नवी दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं आहे. या दोन पक्षांची आघाडी झाल्याने भाजपकडून सावध पावलं टाकली जात असून दिल्लीतील ७ लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांबाबत सध्या पक्षात विचारमंथन सुरू आहे. या ७ जागांसाठी ज्या उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे त्यामध्ये दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि बांसुरी स्वराज यांच्याही नावाचा समावेश आहे. बांसुरी स्वराज या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत. बुधवारी भाजपने सातही मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या नावांबाबत फीडबॅक आणि सर्व्हे घेण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत काही विद्यमान खासदारांचं तिकीटही कापलं जाण्याची शक्यता आहे.

दिल्ली भाजप अध्यक्षांकडे ७ मतदारसंघांसाठी तब्बल २८ इच्छुक उमेदवारांची यादी आली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे राज्यांच्या निवडणूक समित्यांसोबत चर्चा करणार आहेत. यामध्ये दिल्लीतून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या २८ उमेदवारांच्या नावांबद्दल चर्चा होणार असल्याचे समजते.

गंभीरचा पत्ता कट, अक्षय कुमारला मैदानात उतरवणार? 

दिल्लीतील भाजपच्या ३ विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटर आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या गौतम गंभीर याचाही समावेश आहे. तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा विचार भाजपकडून केला जात असल्याची माहिती आहे. 

भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत १२५ लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीतील नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय निवडणूक समितीचे सर्व सदस्य या बैठकीला हजर राहतील. सूत्रांनुसार, आजच्या बैठकीनंतर भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करेल. 

Web Title: BJP lok sabha candidates in Delhi Gautam Gambhir Akshay Kumar updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.