'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:58 IST2025-10-31T16:58:24+5:302025-10-31T16:58:56+5:30
''देश एका व्यक्तीच्या भरोशावर चालत नाही."

'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली : "देश एका व्यक्तीच्या भरोशावर चालत नाही," असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी सरकारवर देशाचे तुकडे केल्याचा आरोपही केला. यासोबतच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) पुन्हा बंदी घालण्याची मागणी केली.
काय म्हणाले खरगे?
पत्रकार परिषदेत बोलताना खरगे म्हणाले, "पंतप्रधान नेहमी म्हणतात, मी केलं, मी बनवलं. पण देश एका व्यक्तीने नाही तर सर्वांच्या प्रयत्नांनी चालतो. पंतप्रधान आणि नेते येतात-जातात, पण देश टिकवून ठेवतात लोक आणि लोकशाही. सरदार पटेलांचा सन्मान काँग्रेसने नेहमीच केला आहे. “स्टॅच्यू ऑफ युनिटी” बद्दल त्यांनी मोदी सरकारचे आभार मानले, पण स्मरण करून दिलं की, सरदार सरोवर प्रकल्पाची पायाभरणी काँग्रेसनं 5 एप्रिल 1961 रोजी केली होती.''
LIVE: Media Byte by Congress President Shri @kharge in New Delhi. https://t.co/ei4DMgU4ce
— Congress (@INCIndia) October 31, 2025
मोदींनी नोटबंदी केली, पण 2 कोटी नोकऱ्या कुठे गेल्या?
खरगे यांनी पंतप्रधानांवर वैयक्तिक टीका करत म्हटलं, ''मोदी साहेबांना ‘मी केलं’ म्हणायची सवय आहे. ठीक आहे, नोटबंदी केलीत, पण त्याचा परिणाम काय झाला? दोन कोटी नोकऱ्या देण्याचं वचन दिलं, पण आजही तरुण बेरोजगार आहेत.'' पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना खरगे म्हणाले, ''मोदी आणि अमित शाह नेहमी म्हणतात की, काँग्रेसने सरदार पटेलांना दुर्लक्षित केलं, पण आम्ही त्यांना नेहरू-इंदिरा यांच्या बरोबरीचं स्थान दिलं. इतिहास वाचा, नेहरू आणि पटेल यांच्यात परस्पर सन्मान होता, संघर्ष नव्हता.''
आरएसएसवर पुन्हा बंदी घालावी
खरगे यांनी आठवण करून दिली की, सरदार पटेल यांनी आरएसएस आणि जमात-ए-इस्लामीवर बंदी घातली होती. ''आज त्याच संस्थेला सरकारी कर्मचाऱ्यांशी जोडण्याची परवानगी दिली जात आहे, हे पटेल यांच्या वारशाचा अपमान आहे. जर मोदी आणि अमित शाह खरोखरच पटेलांचा सन्मान करतात, तर त्यांनी त्यांच्या मार्गावर चाललं पाहिजे. देशात वाढत्या धार्मिक तणावाला आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीला आरएसएस जबाबदार आहे. त्यामुळे मी खुलेपणाने सांगतो, आरएसएसवर पुन्हा बंदी घालावी.''