Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:57 IST2025-11-05T12:54:29+5:302025-11-05T12:57:52+5:30
छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला, तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले.

Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला, तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले. मंगळवारी दुपारी ४ वाजता गेवरा रोड-बिलासपूर मेमू लोकल ट्रेन गौतौरा स्टेशनजवळ एका मालगाडीला धडकली. धडक इतकी भीषण होती की, मेमू ट्रेनचा पहिला डबा पूर्णपणे खराब झाला, ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ही दुर्घटना आठवली की, अजूनही हा अपघात डोळ्यांनी पाहणाऱ्या प्रवाशांच्या जीवाचा थरकाप होतो.
मेमू ट्रेनच्या पहिल्या डब्यात बसलेल्या बिल्हा येथील रहिवासी संजीव विश्वकर्मा यांनी सांगितले की, ट्रेन अचानक जोरात धडकली आणि त्यानंतर सगळीकडे अंधार झाला. जेव्हा त्यांनी डोळे उघडले, तेव् ते एका तुटलेल्या सीट खाली अडकलेले होते. इतकंच नाही तर, त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक मृतदेह पडले होते. रायपूर येथील रहिवासी मोहन शर्मा यांनी सांगितले की, लिंक एक्सप्रेस उशिरा आल्याने ते लोकल ट्रेनमध्ये चढले होते. धडक इतकी जोरदार होती की, त्यांचा पाय सीट खाली अडकला आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांना बाहेर काढण्यात खूप अडचण आली. बिलासपूर येथील मेहबीश परवीन या विद्यार्थिनीने सांगितले की, अपघातादरम्यान तिचा पाय अक्षरशः मोडला होता. अपघातामुळे सर्वत्र गोंधळ उडाला होता आणि लोक ओरडत होते.
गॅस कटरच्या मदतीने डबे कापले
अपघातानंतर लगेचच रेल्वे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. डबे कापण्यासाठी आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. अपघातस्थळ बिलासपूर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे.
बिलासपूरचे जिल्हा दंडाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितले की, गेवरा रोडवरून निघालेली मेमू ट्रेन गौतोरा आणि बिलासपूर स्थानकांदरम्यान मागून येणाऱ्या मालगाडीला धडकली. रेल्वे मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना ५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची आर्थिक मदत देईल. मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनीही अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. जखमींवर बिलासपूरमधील अपोलो हॉस्पिटल, छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
गावकऱ्यांनी बचाव कार्यात मदत केली
स्थानिकांनी सांगितले की, धडकेचा आवाज ऐकताच, जवळच्या गावातील लोक घटनास्थळी धावले आणि बचाव कार्यात मदत केली. या अपघातामुळे सुमारे १२ गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. केंद्रीय मंत्री तोखन साहू आणि आमदार धर्मलाल कौशिक यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली. अपघाताचे कारण शोधण्यासाठी रेल्वेने रेल्वे सुरक्षा आयुक्त स्तरावर घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.