Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 09:20 IST2025-11-14T09:20:23+5:302025-11-14T09:20:55+5:30
Bihar Election 2025 Result: ९ वाजेपर्यंत हाती कल आले, त्यानुसार भाजपा आणि आरजेडी या दोन्ही पक्षात चुरस पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस बरीच पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.

Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
Bihar Election 2025 Result: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला पोस्टल व्होटिंगची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मोजणी सुरू करण्यात आली. ९ वाजेपर्यंत हाती आलेले कल अतिशय उत्सुकता वाढवणारे पाहायला मिळत आहेत. भाजपा आणि आरजेडी यांच्या काँटे की टक्कर पाहायला मिळत असून, एनडीए आघाडीवर आहे.
Bihar Election Result 2025 Live: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएमधील घटक पक्ष असलेला भाजपाचे ५१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेट पक्षाचे ४२ उमेदवार आघाडीवर आहेत. महागठबंधनचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे ५१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे ६ उमेदवार आघाडीवर आहेत. निवडणुकीच्या रणसंग्रामात पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. तर ११ ठिकाणी अपक्ष आघाडीवर आहेत.
कोणत्या पक्षाचे उमेदवार आघाडीवर?
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले तेजस्वी यादव आघाडीवर आहेत. तर, जेजेडीचे नेते तेज प्रताप यादव महुआ येथून आघाडीवर आहेत. भाजपाकडून उमेदवारी मिळालेली प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर अलीनगर येथून आघाडीवर आहे. याशिवाय जेडीयूचे अनंत कुमार सिंह, विजय कुमार चौधरी, आरजेडीचे ओसामा शहाब आघाडीवर आहेत. भाजपाचे नितीन नबीन, प्रेम कुमार, रेणू देवी, नितीश मिश्रा, विजय कुमार सिन्हा आघाडीवर आहेत.
निवडणूक आयोगाचे कठोर नियम
मतमोजणी केंद्रांवर पूर्णतः पारदर्शकता राखण्यासाठी आयोग दक्ष आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, जर कोणत्याही बूथमध्ये मतांच्या संख्येत किंवा नोंदीत विसंगती आढळली, तर त्या बूथवरील वीवीपॅट चिठ्ठ्यांची गणना केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक टेबलवर काउंटिंग सुपरवायझर, काउंटिंग असिस्टंट आणि मायक्रो ऑब्झर्वरची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, उमेदवारांनी नियुक्त केलेले १८,००० हून अधिक काउंटिंग एजंट प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले होते. या निवडणुकीत मतदानाचा नवा विक्रम नोंदवला गेला. दोन्ही टप्प्यांत मिळून तब्बल ६७.१३ टक्के विक्रमी मतदान झाले. बिहारमध्ये एकूण ७,४५,२६,८५८ मतदार असून, यापैकी ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला होता. आता या विक्रमी मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.