बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:48 IST2025-11-01T16:46:23+5:302025-11-01T16:48:17+5:30
बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत तर बहुमताचा आकडा १२२ आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले होते.

बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
Bihar Election Survey: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी २ टप्प्यात मतदान होणार आहे आणि त्यानंतर १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. या निवडणुकीत एनडीएविरुद्ध महाआघाडीशिवाय प्रशांत किशोर याचा जनसुराज पक्षही मैदानात आहे. यंदाची बिहार निवडणूक रंगतदार होत आहे. राज्यात निवडणूक प्रचाराचे वारे वाहत आहे त्यातच एक ओपिनियन पोल समोर आला आहे. ज्यात बिहारमध्ये कुणाचे सरकार बनू शकते याचा अंदाज वर्तवला आहे.
पोलनुसार, एनडीए पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता स्थापन करू शकते. त्यात एनडीएला १२०-१४० जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महाआघाडीला ९३ ते ११२ जागांवर समाधान मानावे लागू शकते. या सर्व्हेत भाजपाला ७०-८१, जेडीयू ४२-४८, एलजेपी ५-७, हम - २ आणि आरएलएमला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. जेवीसी ओपिनियन पोलमधून ही माहिती समोर आली आहे. महाआघाडीत आरजेडीच्या वाट्याला ६९-७८ जागा मिळू शकतात. काँग्रेसला ९ ते १७ जागा, सीपीआय (एमएल) १२-१४ जागा तर इतरांना प्रत्येकी १-२ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
तसेच ज्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीची चर्चा आहे. त्यांना सर्व्हेत केवळ एकाच जागेवर विजय मिळताना दिसत आहे. सोबतच एआयएम, बसपा इतरांच्या खात्यात ८ ते १० जागा जाऊ शकतात असं सर्व्हेत म्हटलं आहे. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत, एनडीएला महाआघाडीपेक्षा दोन टक्के जास्त मते मिळण्याचा अंदाज आहे. एनडीएला ४१-४३ टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे तर महाआघाडीला ३९-४१ टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. जनसुराजला सहा ते सात टक्के मते मिळू शकतात तर इतरांना १०-११ टक्के मते मिळू शकतात असा सर्व्हे रिपोर्ट सांगतो.
दरम्यान, बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत तर बहुमताचा आकडा १२२ आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले, ज्यामध्ये आरजेडी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. आरजेडीने ७५ जागा जिंकल्या, तर भाजपाने ७४, जेडीयूने ४३, काँग्रेसने १९, एलजेपीने १ आणि इतरांनी ३१ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.