Muzaffarnagar Kanwar Route:उत्तर प्रदेशात कावड यात्रा सुरू होण्यासाठी आता काही दिवसच उरले आहेत. धार्मिक संघटना आणि सामाजिक संघटनांकडून यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र यादरम्यान, काही संघटनांकडून पहचान अभिया राबवलं जात आहे. अशातच शनिवारी मुझफ्फरनगरमध्ये हॉटेल मालकाच्या ओळख पटवण्यावरुन नवा वाद निर्माण झाला. दिल्ली-डेहराडून महामार्गावर असलेल्या पंडित जी वैष्णो ढाब्यावर पहचान अभियानाचे काही लोक पोहोचले होते. त्यांनी तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आधार कार्ड मागितले. ढाब्यावरील कामगारांनी ते न दिल्याने त्यांनी ढाब्यावरील बारकोड स्कॅन केला. मालकाचे नाव मुस्लिम समुदायाचे असल्याचे समजल्यावर त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तपासणी करणाऱ्यांनी कामगारांना एका खोलीत नेऊन त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपाने प्रकरण मिटवण्यात आलं. मात्र एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या प्रकरणावरुन टीका केली आहे.
उत्तर प्रदेशात कावड यात्रेवरुन सध्या वातावरण चांगलेच तापलं आहे. दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय महामार्ग-५८ वर हिंदू संघटनांनी तपासणी मोहीम सुरू केली आहे. स्वामी यशवीर महाराजांशी संबंधित संघटनेचे काही लोक महामार्गावर असलेल्या पंडित जी वैष्णो ढाब्यावर पोहोचले. त्यांनी तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आधार कार्ड मागितले. त्यांनी ते दिले नाही तेव्हा त्यांनी ढाब्यावरील बारकोड स्कॅन केला. मालकाचे नाव मुस्लिम समुदायाचे असल्याचे समोर आल्यानंतर लोकांनी कर्मचाऱ्यांना एका खोलीत नेले आणि त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांनी पॅन्ट काढायला लावली असा आरोप ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी केला.
"ढाब्यावरील कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पँट काढण्यास सांगण्याच्या प्रकरणावर असदुद्दीन ओवैसी यांनी निशाणा साधला. मुझफ्फरनगर बायपासजवळ तीन गावे आहेत, जिथे अनेक हॉटेल्स आहेत. दहा वर्षांपूर्वी या ठिकाणी काहीही घडत नव्हते. कावड यात्रा शांततेत व्हायची. पहचान अभियान म्हणजे काय आहे? जेव्हा हॉटेलमध्ये गेले तेव्हा आधार कार्ड सापडले नाही, म्हणून पँट काढण्यास सांगितले गेले. नंतर पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. नोटीस देऊन काहीही होत नाही, त्यांना अटक करा. पोलीस आपले काम करत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अजूनही लागू आहे," असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
दुसरीकडे, हॉटेल मालकाची ओळख पटवण्याच्या प्रकरणात, पोलिसांनी स्वामी यशवीर महाराजांशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. पोलिसांनी सुमित बहरागी, रोहित, विवेक, सुमित, सनी आणि राकेश अशी सहा कार्यकर्त्यांची ओळख पटवली आहे, जे बाघरा येथील स्वामी यशवीर यांच्या योग आश्रमाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.