चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:33 IST2025-11-03T12:32:42+5:302025-11-03T12:33:46+5:30
याठिकाणी इतके बॅरेक आणि क्वार्टर्स आहेत जिथे एकाचवेळी १० हजाराहून अधिक सैनिक राहू शकतात

चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
नवी दिल्ली - अफगाणिस्तानच्या बगराम एअरबेसवर अमेरिका, चीन, पाकिस्तान सर्वांची नजर आहे. एकीकडे अमेरिकेला बगराम एअरबेस पुन्हा मिळवण्याची इच्छा आहे तर दुसरीकडे चीनच्या आण्विक केंद्रापासून या एअरबेसचं अंतर खूप कमी आहे. या एअरबेसपासून पाकव्याप्त काश्मीर आणि बलूचिस्तान अंतरही कमी आहे. याच ठिकाणाहून मध्य आशियाचा मार्ग खुला होतो. अलीकडेच सोशल मीडियावर अफगाणिस्तानातीलतालिबान शासन हा एअरबेस भारताला सोपवण्याची चर्चा सुरू होती. परंतु अफगाणिस्तानी अधिकाऱ्यांनी ही चर्चा फेटाळली. असा कुठलाही प्रस्ताव तालिबाननेभारताला दिला नाही आणि भारतानेही अशी कुठलीही इच्छा व्यक्त केली नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका रिपोर्टनुसार, बगराम एअरबेसपासून चीनमधील आण्विक प्रयोगशाळा २ हजार किमी अंतरावर आहे. रस्ते किंवा अन्य मार्गाने हे अंतर काही तासांचे आहे. लॉकहिड एसआर ७१, ब्लॅकबर्डसारखे आधुनिक लष्करी विमान हे अंतर काही मिनिटांत पार करू शकतात. बगराम एअरबेस काबुलच्या उत्तरेकडे ६० किमी अंतरावरील परवान प्रांतात बनलेले आहे. हा एअरबेस १९५० च्या दशकात सोव्हियत संघाने बनवला होता आणि १९८० च्या दशकात अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर हे त्यांच्या सैन्याचे मुख्य ठिकाण होते. २००१ साली जेव्हा अमेरिकेने तालिबानला सत्तेतून हटवले त्यानंतर या एअरबेसवर अमेरिकेचे नियंत्रण होते.
जेव्हा अमेरिकेने बगराम एअरबेसवर ताबा मिळवला तेव्हा हा एअरबेस उद्ध्वस्त झाला होता. परंतु अमेरिकन लष्कराने पुन्हा हा नव्याने बनवला. जवळपास ७७ किमी परिसरात हा पसरला आहे. बगराम अमेरिकेचा सर्वात मोठा आणि जगातील सर्वात मजबूत एअरबेस पैकी एक होता, जो क्रॉक्रिंट आणि स्टीलपासून बनवण्यात आला होता. बगराम एअरबेस मजबूत भिंतींनी घेरलेला आहे. त्याच्या आसपासचा परिसर सुरक्षित असून बाहेरून आत कुणीही प्रवेश करू शकत नाही. याठिकाणी इतके बॅरेक आणि क्वार्टर्स आहेत जिथे एकाचवेळी १० हजाराहून अधिक सैनिक राहू शकतात. मागील ३ वर्षापासून बगराम एअरबेसवर तालिबानचे सैन्य अमेरिकन सैनिकांनी सोडलेल्या सामानाचा वापर करत आहेत.
अमेरिकेला बगराम एअरबेस पुन्हा का हवाय?
बगराम एअरबेसवर २ रन वे पैकी एक रनवे अडीच किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच ब्रिटन दौऱ्यावर गेले होते. तिथे बगराम जगातील सर्वात मोठ्या एअरबेस पैकी एक आहे आणि आम्ही ते दिले होते. परंतु आता पुन्हा आम्हाला ते हवे. कारण चीन जिथे अण्वस्त्रे बनवतो तिथून ते फक्त एक तासाच्या अंतरावर आहे असं त्यांनी म्हटलं होते. यामुळे वाद निर्माण झाला. जेव्हा अमेरिकन सैन्याने हवाई तळ सोडला तेव्हा मोठ्या प्रमाणात लष्करी उपकरणे, लष्करी वाहने आणि दारूगोळा तिथेच राहिला असल्याचं ट्रम्प यांनी आठवण करून दिली.
भारतासाठी किती महत्त्वाचे?
ताजिकिस्तानमधील आयनी एअरबेस हातातून निसटल्यानंतर भारतासाठी बगराम एअरबेस महत्त्वपूर्ण आहे. भारताला मध्य आशियात आपली पकड मजबूत ठेवायला हवी. एकीकडे इराणच्या चाबहार बंदरावर भारताने गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे पीओके, बलूचिस्तानमध्ये अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानच्या कुठल्याही नापाक हरकतींना उत्तर देण्यासाठी त्यामुळे मदत होईल. बगराम एअरबेसवर इतर कुठल्या देशाने नियंत्रण मिळवले तर ते भारतासाठी डोकेदुखी ठरेल. त्यामुळे तालिबानसोबत राजनैतिक संबंधांचा वापर करून हा एअरबेस मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं तज्ज्ञ सांगतात.