मुंबई/नवी दिल्ली : आखाती देशांतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहे. आता सरकारने आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठीच्या इंधन दरात वाढ केल्यामुळे एअर इंडियाने रोज १०० उड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही मार्गांवरील उड्डाणांचा समावेश आहे.
एअर इंडिया सध्या रोज अंदाजे १,१०० उड्डाणे चालवते. परंतु, इंधन दरवाढीमुळे जूनपासून युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मार्गांवरील सर्वाधिक उड्डाणे कमी केली जातील. तथापि, १ मे रोजी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार एटीएफच्या किमतीत बदल केला नाही. त्यामुळे देशांतर्गत विमान उड्डाणांसाठी थोडा दिलासा मिळाला आहे, असेही एअरलाइन्सने म्हटले आहे. सरकारने तातडीने मदत केली नाही, तर आणखी उड्डाणे थांबवली जाऊ शकतात, असा इशारा फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने तीनच दिवसांपूर्वी दिला आहे.
सुप्रीम कोर्टाकडून केंद्राची कानउघाडणीविमानांच्या तिकीट दरात होणारे अनपेक्षित चढ-उतार आणि प्रवाशांकडून आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क यांवर नियंत्रण मिळवण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, विमान कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी ४० टक्के खर्च एटीएफवर होतो. त्यामुळे एटीएफच्या दरात वाढ झाल्यास विमान तिकीटांचे दर वाढतील आणि कंपनीला तोटा होईल, असे एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आधीच म्हणालो होतो, निवडणुकांनंतर महागाईचा भडका; राहुल गांधी यांची सरकारवर टीका
मी आधीच म्हणालो होतो, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर महागाईचा भडका उडेल, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवरून केंद्र सरकारवर टीका केली. १ मेपासून १९ किलो वजनाचा गॅस सिलिंडर तब्बल ९३३ रुपयांनी महागला आहे. यावरून गांधी यांनी टीका केली आहे. आज व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ९३३ रुपयांची वाढ झाली आहे. ही आजवरची एक दिवसातील सर्वात मोठी वाढ असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. फेब्रुवारीपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत एकूण १,३८० रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच गेल्या तीन महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत ८१ टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे, असेही ते म्हणाले. व्यावसायिक गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता आणि छोट्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडेल. चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स, बेकारी, मिठाईच्या दुकानांना सर्वाधिक फटका बसेल. हॉटेलमधील खाणे महाग होईल. त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर पडेल, असेही राहुल गांधी म्हणाले.
आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना धक्कादेशांतर्गत विमान सेवांसाठी इंधन दरात वाढ करण्यात आलेली नाही. परंतु, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी मात्र बल्क इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवांसाठी इंधनाचे दर प्रति किलो लिटरला ७६.५५ डॉलरप्रमाणे वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच इंधन दर १,४३५.३१ अमेरिकन डॉलरवरून १,५११.८६ अमेरिकन डॉलरवर गेले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी हा माेठा धक्का आहे.
Web Summary : Fuel price hikes prompt Air India to reduce 100 daily flights, impacting international routes. Domestic flights get slight relief. Rahul Gandhi criticizes gas price hikes. Court questions ticket prices.
Web Summary : ईंधन की कीमतों में वृद्धि के कारण एयर इंडिया को प्रतिदिन 100 उड़ानें कम करनी पड़ी, जिससे अंतर्राष्ट्रीय मार्ग प्रभावित हुए। घरेलू उड़ानों को थोड़ी राहत मिली। राहुल गांधी ने गैस की कीमतों में बढ़ोतरी की आलोचना की। कोर्ट ने टिकट की कीमतों पर सवाल उठाए।