Air India Plane Crash: 'तो' इशारा गांभीर्यानं घेतला असता, तर अपघात झाला नसता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 02:55 AM2020-08-09T02:55:56+5:302020-08-09T06:46:59+5:30

आधी चौकशी होऊ द्या मग निष्कर्ष काढा; नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी

Air India Plane Crash expert warned about risk of table top runway at kozhikode airport | Air India Plane Crash: 'तो' इशारा गांभीर्यानं घेतला असता, तर अपघात झाला नसता

Air India Plane Crash: 'तो' इशारा गांभीर्यानं घेतला असता, तर अपघात झाला नसता

Next

नवी दिल्ली/कोझीकोडे : कोझिकोडेचा विमानतळ ‘टेबलटॉप’ म्हणजे डोंगरमाथ्यावर असलेल्या व धावपट्टीच्या दोन्ही बाजूंस दरी असलेला आहे. येथे धावपट्टीवरून धावताना विमान घसरून मोठा अपघात होण्याचा धोका आहे, असा इशारा हवाई वाहतूक सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ गेली अनेक वर्षे देत आले आहेत. शुक्रवारच्या अपघातामागेही हे कारण असू शकेल, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली. मात्र नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी ही शक्यता सध्या तरी गांभीर्याने विचारात घ्यायला तयार नसल्याचे दिसले. पुरी यांनी शनिवारी अपघातस्थळास भेट देऊन पाहणी केली. पत्रकारांनी त्यांच्यावर ‘टेबलटॉप’ विमानतळांविषयी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर ते म्हणाले, अशा प्रकारचे हे काही एकमेव विमानतळ नाही. दुर्दैवाने अपघातात मृत्यू पावलेले विमानाचे पायलट कॅ. दीपक साठे हे कुशल आणि अनुभवी वैमानिक होते. त्यांनी याच विमानतळावर याआधी २७ वेळा विमान उतरविले होते.

दोन्ही ‘ब्लॅकबॉक्स’ ताब्यात
दरीत पडून दोन तुकडे झालेल्या अपघातग्रस्त विमानातील दोन्ही ‘ब्लॅकबॉक्स’ सुरक्षितपणे बाहेर काढून तपासासाठी ‘एअर अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’च्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
‘ब्लॅकबॉक्स’ असे नाव असले तरी या विमानाच्या वैमानिक कक्षात अत्यंत सुरक्षित ठिकाणी बसविलेल्या नारिंगी रंगाच्या दोन मजबूत पोलादी आवरणाच्या दोन पेट्या असतात. त्यात ‘कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर’ व ‘फ्लाईट टेडा रेकॉर्डर’ ही दोन खूप महत्त्वाची व अत्यंत संवेदनशील यंत्रे असतात.
‘कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर’ वैमानिकांचे आपसातील व वैमानिक आणि कंट्रोल टॉवर यांच्या दरनम्यानचे संभाषण निरंतर रेकॉर्ड करत असतो. ‘कॉकपिट डेटा रेकॉर्डर’ विमानाचा वेग, हवेत त्याची उंची, मार्ग, दिशा अशा सतत बदलत जाणाऱ्या गोष्टींची नोंद ठेवतो. माहितीचे विश्लेषण करून अपघाताचे कारण अचूकतेने ठरविता येते.

२३ जखमी अत्यवस्थ
अधिकृत माहितीनुसार शनिवार सायंकाळपर्यंत या अपघातातील मृतांचा आकडा १९ वर पोहोचला. मृतांमध्ये सात पुरुष, एक लहान मूल व इतर महिला आहेत. १४९ जखमींपैकी २३ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यापैकी तिघे व्हेंटिलेटरवर आहेत. २३ जखमींना उपचारांनंतर घरी पाठविण्यात आले आहे.
जखमींवर कोझिकोडे व मल्लापुरम येथील इस्पितळांमध्ये उपचार सुरु आहेत. मृत्यू पावलेले वैमानिक कॅ. दीपक वसंत साठे व सहवैमानिक अखिलेश शर्मा यांच्या कुटुंबियांना विमान कंपनीने येथे आणण्याची व्यवस्था केली. उत्तरीय तपासणीनंतर दोघांचेही मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केले गेले.

मृतांच्या कुटुंबांना २० लाख
अपघातातील मृतांच्या कुटुंबांना केंद्र व केरळ सरकारने मिळून एकूण प्रत्येकी २० लाख रुपयांची मदत जाहीर केली. नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी व केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी यासंबंधीच्या घोषणा केल्या.

केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपये तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपये दिले जातील. केरळ सरकार मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये देईल. शिवाय सर्व जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च करेल.

धावपट्टी सुरू होण्याआधीच विमान जमिनीवर टेकले
शुक्रवारीही विमान उतरविण्याआधी वैमानिक कॅ. साठे यांनी मुसळधार पाऊस पडत असल्याने योग्य वेळ व योग्य जागा निवडण्यासाठी विमानतळास तीन घिरट्या घातल्या होत्या. शेवटी त्यांनी धावपट्टीवर उलट्या बाजूने विमान उतरविण्याचे ठरविले व कदाचित अंदाज चुकल्याने धावपट्टी सुरु होण्याच्या एक हजार मीटर आधीच जमिनीवर टेकले, असे फ्लाईट कंट्रोल रडारच्या डेटावरून वाटते.

त्यांना बसू कसे दिले?
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या दुबईहून आलेल्या विमानास शुक्रवारी रात्री येथील विमानतळावर झालेल्या अपघातातील मृत व जखमी प्रवाशांपैकी अनेक जण कोरोनाबाधित असल्याचे चाचणीनंतर आढळून आल्याने मुळात या महामारीची लागण झालेल्या प्रवाशांना बसूच कसे दिले गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सर्व मृत प्रवाशांची व उपचार घेत असलेल्या १४९ जखमींची कोरोना चाचणी घेण्यासोबतच अपघातानंतर मदत व बचावकार्यात सहभागी झालेल्या शेकडो लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे केरळ सरकारने ठरविले आहे.

सहवैमानिकाच्या पत्नीस पती निधनाचे वृत्त सांगितलेच नाही
मथुरा : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला शुक्रवारी कोझिकोडे येथे झालेल्या अपघातात मृत्यू पावलेले ३१ वर्षांचे सहवैमानिक अखिलेश शर्मा यांच्या पत्नीला पती निधनाची वार्ता घरच्या मंडळींनी अद्याप सांगितलेली नाही. अखिलेश यांचा धाकटा भाऊ लोकेश म्हणाला की, विमानाला अपघात झाला याची भाभीला (मेघा) कल्पना आहे; पण येत्या काही दिवसात तिची प्रसूती अपेक्षित असल्याने धक्का बसू नये यासाठी आम्ही तिला सांगितलेले नाही. वडील तुलसी राम शर्मा यांचा व्यवसाय आहे. त्यांना अखिलेश, भुवनेश व लोकेश ही तीन मुले व एक विवाहित मुलगी आहे. मथुरेत अमरनाथ कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वैमानिकाचे प्रशिक्षण गोंदिया येथील सीएई ऑक्सफर्ड अ‍ॅव्हिएशन अ‍ॅकॅडमीमध्ये घेतले होते.

Web Title: Air India Plane Crash expert warned about risk of table top runway at kozhikode airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.