काँग्रेसला आणखी एका ऑपरेशन लोटसची भीती?; सोनियांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 03:50 PM2020-03-10T15:50:42+5:302020-03-10T16:06:44+5:30

मध्य प्रदेशची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी; मुख्यमंत्री सोनिया गांधींच्या भेटीला

After Madhya Pradesh bjp likely to do operation lotus in Rajasthan kkg | काँग्रेसला आणखी एका ऑपरेशन लोटसची भीती?; सोनियांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली

काँग्रेसला आणखी एका ऑपरेशन लोटसची भीती?; सोनियांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली

Next
ठळक मुद्दे आज सकाळीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातले मतभेद वारंवार समोर आले आहेत. एकूण 200 आमदारांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसकडे एकूण 112 आमदारांचा पाठिंबा आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधलं काँग्रेस सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्ष नेतृत्वाकडे राजीनामा पाठवून दिला आहे. आज सकाळीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी गृहमंत्री अमित शहादेखील त्यांच्या सोबत होते. यानंतर सिंधिया तिथून अमित शहा यांच्या कारमधून निघाले. आज संध्याकाळी ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

मध्य प्रदेशमधील नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. या भूकंपाचे झटके मध्य प्रदेशाला लागून असलेल्या राजस्थानमधल्या काँग्रेस सरकारला बसण्याची भीती काँग्रेसला वाटत आहे. राजस्थानमध्ये मध्य प्रदेशची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काँग्रेस नेतृत्व कामाला लागलं आहे. रिपब्लिक टिव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया यांनी गेहलोत यांना दिल्लीला येण्याचे आदेश दिले होते.

'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले

...म्हणून आजचा दिवस ज्योतिरादित्य सिंधियांसाठी खास; लवकरच धरणार भाजपचा 'हात'

 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातले मतभेद राज्यसभेच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा समोर आले आहेत. हिरे व्यापार क्षेत्रातलं मोठं नाव असलेल्या राजीव अरोरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी, असा आग्रह मुख्यमंत्री गेहलोत यांनी धरला आहे. मात्र याला उपमुख्यमंत्री पायलट यांचा विरोध आहे. पायलट यांनी काल संध्याकाळीच मध्य प्रदेशातल्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारं ट्विट केलं. तेव्हापासून काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. 

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातले मतभेद वारंवार समोर आले आहेत. कोटामधल्या शासकीय रुग्णालयात झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूंबद्दल पायलट यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखं पाऊल उचलू नये यासाठी काँग्रेस नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत.

एकूण 200 आमदारांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसकडे एकूण 112 आमदारांचा पाठिंबा आहे. सीपीएमच्या 3, तर राजद आणि बसपाच्या प्रत्येकी एका आमदाराने सरकारला पाठिंबा दिला आहे. भाजपकडे 80 आमदार आहेत. त्यामुळे 20 आमदारांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यास राजस्थान काँग्रेसच्या हातून जाऊ शकतं.

Web Title: After Madhya Pradesh bjp likely to do operation lotus in Rajasthan kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.