दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 09:32 IST2025-10-05T09:30:15+5:302025-10-05T09:32:09+5:30
Cough Syrup News Marathi: एका कफ सिरपमुळे दहा मुलांना आपले प्राण गमवावे लागले. मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक केली.

दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या
Cough Syrup News Latest: मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये १० मुलाचा मृत्यू झाला. देशभरात या घटनेने खळबळ उडाली. कप सिरपमुळे इतके जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत हे औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक केली. डॉ. प्रवीण सोनी असे या डॉक्टरचे नाव आहे.
मुलांचे मृत्यू झाल्यानंतर शनिवारी (४ ऑक्टोबर) परसिया पोलीस ठाण्यात डॉ. प्रवीण सोनी आणि कोल्ड्रिफ सिरप बनवणारी कंपनी Sresun फार्मास्युटिकलच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिरपमध्ये डायएथिलीन ग्लाइकोलचे प्रमाण ४८.६ टक्के
ज्या खोकल्याचा औषधामुळे मुलांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. शनिवारी रात्री त्याचे रिपोर्ट प्राप्त झाले. रिपोर्टनुसार खोकल्याच्या औषधीमध्ये डायएथिलीन ग्लाईकोलचे प्रमाण ४८.६ टक्के इतके आहे. त्यामुळे आरोग्याला धोका असतो.
डॉक्टर आणि कंपनीवर कोणती कलम?
या प्रकरणात पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. ड्रग्ज आणि कॉस्मेटिक कायद्यातील कलम २७ (अ), भारतीय न्याय संहिता कलम १.५ आणि २७६ यांचा समावेश आहे.
डॉक्टरविरोधात परसिया येथील आरोग्य केंद्राचे प्रमुख अंकित सहलाम यांनी तक्रार दिली होती. छिंदवाडामध्ये मृत्यू झालेल्या बहुतांश मुलांना देण्यात आलेले कफ सिरप डॉ. प्रवीण सोनीनेच लिहून दिले होते.
दोषींना सोडणार नाही -मुख्यमंत्री
दरम्यान, या घटनेबद्दल बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, "छिंदवाडामध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मुलांचे मृत्यू झाल्याची घटना वेदनादायक आहे. या सिरपच्या विक्री मध्य प्रदेशात बंदी घालण्यात आली आहे. हे सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या इतर वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे."
"या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य स्तरावर एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांना सोडले जाणार नाही", अशी माहिती मुख्यमंत्री यादव यांनी दिली.