दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 15:36 IST2025-08-18T15:36:21+5:302025-08-18T15:36:53+5:30
Uttar Pradesh Crime News: नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे घडली आहे.

दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे घडली आहे. महाराजगंज येथील सनबीम विद्यालयामध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या आदित्य वर्मा नावाच्या विद्यार्थ्याची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा आरोप नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांवर झाला असून, त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. दोन्ही विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोमवारी गाझीपूर येथील महाराजगंज येथी सनबीम विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला. त्यादरम्यान, नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या आदित्य वर्मा नावाच्या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार केले.
या हल्ल्यामध्ये आदित्य वर्मा हा गंभीर जखमी झाला . त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आता पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. तसेच या वादामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची आणि इतर काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती दिली आहे.