छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यात असलेल्या वेदांता लिमिटेडच्या थर्मल पॉवर प्लांटमध्ये मंगळवारी काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. बॉयलरमधील हायप्रेशर वाफेची स्टील ट्यूब फुटल्याने झालेल्या भीषण स्फोटात मृतांचा आकडा आता १७ वर पोहोचला आहे. ७०० डिग्री सेल्सिअस तापमानाची ही धगधगती वाफ अंगावर आल्याने अनेक कामगारांचा जागीच कोळसा झाला, तर अनेकजण गंभीररित्या होरपळले आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सिंघीतराई येथील या प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. बॉयलरमधून टरबाइनकडे हायप्रेशर वाफ घेऊन जाणारी एक मोठी स्टील ट्यूब अचानक मोठा आवाज होऊन फुटली. त्यावेळी बॉयलरमधील तापमान ७०० डिग्री सेल्सिअस इतके प्रचंड होते. ही वाफ इतक्या वेगाने आणि उष्णतेने पसरली की कामगारांना तिथून पळ काढण्याची संधीही मिळाली नाही. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांनी जीव गमावला असून १० हून अधिक जण रायपूर आणि रायगडमधील रुग्णालयांत मृत्यूशी झुंज देत आहेत.
मदतीचा ओघ आणि घोषणा
या भीषण दुर्घटनेनंतर केंद्र आणि राज्य सरकारसह कंपनी प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. वेदांता प्रशासनाने मृत कुटुंबांना प्रत्येकी ३५ लाख रुपये, कुटुंबातील एकाला नोकरी, तर जखमींना १५ लाखांची मदत आणि उपचाराचा पूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपये दिले जाणार आहेत.
३० दिवसांत चौकशीचा अहवाल
या भीषण अपघाताच्या मजिस्ट्रीयल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. डभरा येथील एसडीएम या प्रकरणाची सखोल चौकशी करतील. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की कोणाच्या हलगर्जीपणामुळे, याचे सत्य ३० दिवसांत समोर येणार आहे.
राजकारणही तापलं!
एकीकडे मदत कार्य सुरू असताना दुसरीकडे राजकारणही तापले आहे. काँग्रेसने प्लांट प्रशासनावर गंभीर हलगर्जीपणाचा आरोप केला असून, मृतांच्या वारसांना १ कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर एफआयआर दाखल करण्याची मागणीही जोर धरत आहे. हा प्लांट आधी 'एथेना छत्तीसगड पॉवर लिमिटेड'चा होता, ज्याचे २०२२मध्ये वेदांताने अधिग्रहण केले होते. सध्या या १२४० मेगावॅटच्या प्रकल्पातील एक युनिट सुरू असून, दुसऱ्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेने संपूर्ण छत्तीसगडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Summary : A boiler explosion at a Chhattisgarh power plant killed 17 workers. A high-pressure steam pipe burst, engulfing workers in extreme heat. Investigations and compensation announced.
Web Summary : छत्तीसगढ़ के एक बिजली संयंत्र में बॉयलर विस्फोट में 17 श्रमिकों की मौत हो गई। उच्च दबाव वाली भाप पाइप फट गई, जिससे श्रमिक अत्यधिक गर्मी में घिर गए। जांच और मुआवजे की घोषणा की गई।