नियतीचा क्रूर खेळ! वरात काढण्याची तयारी सुरू असतानाच ट्रकने नवरदेवालाच चिरडले, सुबोधचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 14:15 IST2025-11-24T14:14:11+5:302025-11-24T14:15:46+5:30
एकुलत्या एका मुलाचं लग्न असल्याने सगळे कुटुंब आणि नातेवाईक आनंदात होते. वरातीची तयारी सुरू होती. काही वेळात वरात निघणार होती. पण, नियतीने क्रूर खेळ केला.

नियतीचा क्रूर खेळ! वरात काढण्याची तयारी सुरू असतानाच ट्रकने नवरदेवालाच चिरडले, सुबोधचा मृत्यू
सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. बँड वाजत होता. वरात काढण्याची घाई सुरू होती. काही वेळातच नवरदेव सुबोधची वरात निघणार होती, पण घोडीवर बसण्याआधीच त्याचा जीव गेला. रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या सुबोधला भरधाव ट्रकने चिरडले. बराच अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यानंतर सगळीकडे आरडाओरड सुरू झाली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याचा जीव वाचवू शकले नाही.
उत्तर प्रदेशातील बागपतमध्येही भयावह घटना घडली. पिचौकरा गावातील सुबोधच्या लग्नाचे वऱ्हाड रविवारी सायंकाळी सरुरपूर गावात आले. पंचायतीच्या कार्यालयातच वऱ्हाडी थांबलेले होते. सगळे आवरा आवर करत होते. वरातीची घोडी सजवली होती. वाजंत्री वाजवत होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं.
सुबोधचा रुग्णालयात नेण्यापूर्वी मृत्यू
रात्री ११ वाजता वरात निघणार होती. सुबोध तयार होऊन आला होता. घोडीवर बसण्याच्या काही मिनिटं आधी रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याला उडवले. धडक दिल्यानंतर ट्रकचालक थांबला नाही. तो त्याला फरफटत घेऊन गेला. काही मीटरपर्यंत पुढे गेला. त्यानंतर चालक ट्रकसह फरार झाला. अवघ्या काही मिनिटांमध्ये ही घटना घडली.
सुबोधला चिरडल्यानंतर सगळे वऱ्हाडी आरडाओरड करू लागले. काही जणांनी लगेच सुबोधला उचलले आणि जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथून डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. पण, जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सुबोधचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच बिनौली पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सध्या पोलीस फरार असलेल्या ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.
नवरी आणि कुटुंबाला धक्का
सुबोधच्या मृत्यूची बातमी येताच लग्नघरी एकच आक्रोश सुरू झाला. घटनेचा नवरीलाही धक्का बसला. सुबोध हा एकुलता एक मुलगा होता. वरात निघण्याऐवजी आता सुबोधची अंत्ययात्रा काढण्याची वेळ त्याच्या कुटुंबीयांवर आली.