२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:15 IST2026-01-09T12:13:43+5:302026-01-09T12:15:09+5:30
एका अपघातात भिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यासाठी त्याच्या बॅगेची झडती घेतली, तेव्हा त्यात ४५ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम आढळल्याने खळबळ माजली आहे.

फोटो - tv9hindi
केरळमध्ये एका अपघातात भिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यासाठी त्याच्या बॅगेची झडती घेतली, तेव्हा त्यात ४५ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम आढळल्याने खळबळ माजली आहे. अलाप्पुझा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा बॅग तपासली, तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणात परकीय चलन पाहून तेही थक्क झाले. अलाप्पुझा भागात प्रसिद्ध असलेल्या या भिकाऱ्याच्या बॅगेतून पोलिसांनी ही रोकड जप्त केली आहे.
सोमवारी रात्री ही घटना घडली, जेव्हा या भिकाऱ्याला एका वाहनाने धडक दिली. स्थानिक लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र कोणतीही विशेष माहिती न देता त्या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातील नोंदीनुसार त्या व्यक्तीने आपलं नाव 'अनिल किशोर' असं सांगितलं होतं. दुर्दैवाने अनिल किशोर मंगळवारी सकाळी एका दुकानाबाहेर मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्यांच्याजवळ असलेली बॅग तपासासाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आली.
बंदी घातलेल्या नोटा आणि परकीय चलन जप्त
स्थानिक पंचायत सदस्य फिलिप उम्मन यांच्या उपस्थितीत जेव्हा पोलिसांनी बॅग उघडली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. बॅगेत चलनातून बाद झालेल्या नोटा आणि परकीय चलन सापडलं. बॅगेत एकूण ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती. हे पैसे एका जुन्या प्लास्टिकच्या डब्यात भरून बॅगेच्या आत सुरक्षित ठेवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रकमेत २००० रुपयांच्या जुन्या नोटा आणि विविध देशांचं चलन समाविष्ट आहे.
जेवणासाठी लोकांकडे मागायचा पैसे
अनिल किशोर हा दररोज परिसरात भीक मागायचा. अगदी जेवणासाठीही तो लोकांकडे पैसे मागत असे. ज्या भिकाऱ्याकडे खाण्यासाठीही पैसे नसायचे, तो आपल्या झोळीत एवढी मोठी रक्कम घेऊन फिरत होता, याची कोणालाही कल्पना नव्हती. हे ऐकून परिसरातील नागरिक अवाक झाले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जर या रकमेवर दावा करण्यासाठी कुटुंबातील कोणताही सदस्य पुढे आला नाही, तर ही रक्कम न्यायालयाकडे सुपूर्द केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं.