कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींची कामे; मुख्यमंत्र्यांनी तयारीचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:38 IST2025-06-02T11:37:11+5:302025-06-02T11:38:55+5:30
सर्व निर्धारित कामे लवकरात लवकर मार्गी लावली जाणार

कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींची कामे; मुख्यमंत्र्यांनी तयारीचा घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या निमित्ताने ४ हजार कोटींच्या विकासकामांच्या निविदा काढल्या असून, २.५ हजार कोटींची कामे लवकरच मार्गी लावली जाणार असून, एकूण साडेसहा हजार कोटींची विकासकामे होणार आहेत. सर्व निर्धारित कामे लवकरात लवकर मार्गी लावली जाणार असल्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कुंभमेळा सुरक्षित, गोदावरी निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
कुंभमेळ्याबाबत साधू महंतांचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. गत कुंभमेळ्यावेळी तयारीसाठी कालावधी कमी होता. यावेळी पूर्वतयारीसाठी अधिक कालावधी असल्याने शासन चांगली तयारी करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथेदेखील उत्तम सुविधा उभारण्यात येतील. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
'कॉमन मॅन- पोलिस शिल्पा'चे अनावरण
- दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम, उद्घाटने पार पडली. त्यात चित्पावन ब्राह्मण संघ, नाशिक यांच्या हस्ते श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचे लोकार्पण, पोलिस उपायुक्त कार्यालय, 'कॉमन मॅन- पोलिस शिल्पा'चे अनावरण करण्यात आले.
- महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण तथा संशोधन अकादमीतर्फे आयोजित मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप झाला.
४ हजार कोटींच्या निविदा प्रसिद्ध
- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या साडेसहा हजार कोटींच्या कामांपैकी ४ हजार कोटींपेक्षा अधिक कामाच्या निविदा
- प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर लवकरच २ हजार ६०० कोटींच्या निविदा काढण्यात येणार आहेत.
- मात्र, त्यातील अनेक कामे अद्याप कागदावरच असून प्रत्यक्षात साकार होण्यास २०२७ मधील जानेवारी महिन्याची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे.