जिल्ह्यात दोन रेशन दुकाने कॅशलेस

By Admin | Updated: January 14, 2017 00:43 IST2017-01-14T00:43:44+5:302017-01-14T00:43:55+5:30

देवळ्याची निवड : चालू आठवड्यात प्रारंभ

Two ration shops in the district cashless | जिल्ह्यात दोन रेशन दुकाने कॅशलेस

जिल्ह्यात दोन रेशन दुकाने कॅशलेस

नाशिक : नोटाबंदीनंतर केंद्र व राज्य सरकारने रोकडविरहीत व्यवहाराला चालना देण्यासाठी विविध प्रयत्न अवलंबविले असून, त्याचाच भाग म्हणून देवळा तालुक्यातील दोन रेशन दुकानांमध्ये येत्या आठवड्यापासून शिधापत्रिकाधारकांना ‘कॅशलेस’ धान्य वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक वितरणप्रणालीत हे पहिले पाऊल असून, त्यासाठी देवळा येथील दुकान नंबर तीन व चिंचणे येथील दुकानाची निवड करण्यात आली आहे. यासाठी या दोन्ही दुकानांना जोडण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारक व त्याच्या कुटुंबियातील व्यक्तींचे आधारक्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक गोळा करण्यात आले आहेत. याशिवाय कुटुंबप्रमुखाचे बॅँक खाते क्रमांकही नोंदविण्यात आले असून, ही सारी माहिती रेशन दुकानदाराकडील ‘स्वाईप’ यंत्राशी जोडण्यात आलेली आहे. शिधापत्रिकाधारकाला फक्त दुकानात जाताना सोबत भ्रमणध्वनी व धान्यासाठी पिशवी घेऊन जावे लागणार आहे. शिधापत्रिकाधारकासाठी देय असलेल्या धान्याच्या मोबदल्यातील रक्कम दुकानदाराकडील स्वाईप यंत्रावर बॅँक खाते क्रमांक व रक्कम टाकून परस्पर अदा होणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकाला रक्कम बाळगण्याची गरज नाही. नोटबंदीनंतर नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्रयोग होत आहे. केंद्र सरकारने चलनातून हजार व पाचशे रुपयांची नोट हद्दपार केल्यानंतर निर्माण झालेल्या चलन टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने कॅशलेस व्यवहारासाठी पुढाकार घेऊन त्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून शासकीय सेवादेखील कॅशलेस पद्धतीने देण्याला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले आहे. गेल्या महिन्यात यासंदर्भात राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन दुकानदारांची बैठक घेऊन त्यांना कॅशलेस व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Two ration shops in the district cashless