वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 08:16 AM2024-05-26T08:16:09+5:302024-05-26T08:16:45+5:30

शरद पवार किंवा अजित पवार यांचे छायाचित्र नसल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Times have changed so the face has changed Reels of Chhagan Bhujbal supporters spark discussion again | वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण

वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून उमेदवारी मिळाली नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा अवमान झाल्याची भावना निर्माण झाली असतानाच त्यांच्या समर्थकांनी ‘वेळ बदलली, चेहरा बदललाय’ अशा शीर्षकाखाली एक रिल्स व्हायरल केले आहे. भुजबळ हेच एकमेव संघर्ष योद्धा असल्याचे त्यात नमूद केले आहे. मात्र, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे भुजबळ यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीतील केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच छायाचित्र ठेवण्यात आले आहे. शरद पवार किंवा अजित पवार यांचे छायाचित्र नसल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

छगन भुजबळ हे फायरब्रँड नेते आहेत. शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले, तेव्हापासून ते शरद पवार यांच्या जवळचे नेते आहेत. राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतरदेखील ते पवार यांच्याबरोबरच काँग्रेसमधून बाहेर पडले. आता मात्र ते अजित पवार यांच्यासह महायुतीत सामील झाले. भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह यांनी त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले, नंतर मात्र, उमेदवारी घोषितच झाली नाही. यानंतर भुजबळ यांनी आपण नाराज नाही, असे वेळोवेळी सांगितले असले तरी एका खासगी दूरचित्रवाहिनीच्या मुलाखतीत आपला अपमान झाल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळेच भुजबळ समर्थकांनी तयार केलेल्या रिल्समध्ये केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेतचा कृष्णधवल फोटो असून, त्यानंतर त्यांनी मंत्री म्हणून घेतलेली शपथ आणि अन्य फोटो आहेत. ‘एकटा संघर्ष योद्धा, साऱ्यांना भारी’ असे त्याचे शेवटचे कॅप्शन आहे. यात केलेली विकासकामे आणि वंचितांसाठीचा संघर्ष मांडण्यात आला आहे. मात्र, त्यात केवळ शिवसेनाप्रमुखांचा फोटो वगळता शरद पवार किंवा अजित पवार असा कोणाचाही फोटो नसल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

पुढील वाटचाल काय?

छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या हक्कासाठी लढा दिला तसेच अलीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना प्रतिआव्हान दिले. त्यामुळेच त्यांना समर्थकांनी  एकच संघर्ष योद्धा असे नमूद केले आहे. अर्थात, यात रिल्समध्ये नेत्यांचे फोटो नसल्याने पुढील राजकीय वाटचालीचे काही वेगळे संकेत आहेत काय, अशी चर्चा होत आहे.

Web Title: Times have changed so the face has changed Reels of Chhagan Bhujbal supporters spark discussion again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.