जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’

By संतोष हिरेमठ | Published: June 17, 2024 01:05 PM2024-06-17T13:05:51+5:302024-06-17T13:06:58+5:30

नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्वेकडील मिनारचा मोठा भाग कोसळला होता. अशीच घटना शनिवारीही घडली. 

world famous Bibi Ka Tomb | जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’

जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’

संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध बीबी का मकबऱ्याच्या संवर्धनाच्या योजनेची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली आहेत. येथील चारही मिनारचे, तर अगदी ‘तीन तेरा’ वाजले आहेत. ‘दख्खनचा ताज’, ‘मिनी ताज’ अशी ओळख असलेला हा मकबरा आणि मिनार कोसळण्याचीच वाट पाहिली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

बीबी का मकबऱ्यावर  पर्यटकांच्या गर्दीचा, प्रदूषणाचा आणि तिन्ही ऋतूंचा काही परिणाम होत आहे का, याचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला. या अभ्यासाअंती मकबऱ्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने उपाययोजनांसाठी पाऊल उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, संरक्षणाचे पाऊल हे कधी पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्वेकडील मिनारचा मोठा भाग कोसळला होता. अशीच घटना शनिवारीही घडली. 

काय आहे योजना?
 चारही मिनारचे टप्प्याटप्प्यात संवर्धन केले जाणार आहे. मिनारच्या प्लास्टरसाठी चुन्यासह गूळ डिंक, उडीद डाळ, विटांची पावडर वापरण्याचे नियोजन आहे. मात्र, मंजुरी, निधी, काम करणारी एजन्सी निश्चित होणे यातच दोन वर्षे लोटली.  

 काय आहे स्थिती?
मुख्य मकबऱ्यासह चारही मिनारची जागोजागी पडझड झाली आहे. प्लास्टर निखळले आहे. जागोजागी भेगा पडल्या आहेत. नक्षीकामही जागोजागी उखडून गेले आहे. जागोजागी मकबरा काळवंडला आहे.

‘ताजमहाल’च्या धर्तीवर हवी योजना
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने आग्रा येथील ताजमहालच्या पृष्ठभागाचे साचलेल्या प्रदूषकांपासून संरक्षण करण्यासाठी वैज्ञानिक स्वच्छता आणि संवर्धन योजना तयार केली. अशीच योजना बीबी का मकबऱ्याच्या संवर्धनासाठी राबविण्याची गरज आहे. 

बीबी का मकबऱ्याचे टप्प्याटप्प्यात संवर्धन करण्यात येईल. आधी दोन मिनारचे काम केले जाईल. पर्यटकांची ये-जा सुरू ठेवून हे काम करावे लागेल. 
- डाॅ. शिवकुमार भगत, 
अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

Web Title: world famous Bibi Ka Tomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.