वाघरे घाटात दरड कोसळली

By Admin | Updated: September 27, 2016 22:51 IST2016-09-27T22:50:40+5:302016-09-27T22:51:07+5:30

खोळंबा : तरुणांच्या श्रमदानातून वाहतूक सुरळीत

The tide in the Wagre valley collapsed | वाघरे घाटात दरड कोसळली

वाघरे घाटात दरड कोसळली

त्र्यंबकेश्वर : रविवारी पहाटे झालेल्या परतीच्या पावसाने धोंडेगाव ते हरसूलदरम्यान जोरदार हजेरी लावली. यामुळे नदी, नाले, ओहोळ पुन्हा खळाळून वाहू लागले. या सुमारास वाघेरा घाटात डोंगरावरील माती वाहून जात असल्याने तीन ठिकाणी दरडी कोसळल्या. सकाळी १० वाजेच्या सुमारास काही आदिवासी तरुण प्रसंगावधान राखून घाटमार्गात दाखल झाले आणि श्रमदानातून त्यांनी रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितरीत्या खुला करून दिला.
पावसामुळे वाघेरा घाटात नागमोडी वळणांवर दरड कोसळून रस्त्यावर दगड, माती पसरली होती. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. नाकेपाड्याच्या अलीकडे घाटात अखेरच्या वळणावर माती, चिखल झाल्याने वाहतूक काही वेळ थांबली होती. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, सुटीमुळे निसर्ग पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी परिसरातील डोंगरमाथ्यावर जनावरे चारणाऱ्या आदिवासी तरुणांनी रस्त्यावरील माती, दगड बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. चिंचवड परिसरातील काही तरुणांनी रस्त्यावरची खडी, झाडांच्या फांद्या उचलल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. याबाबत मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञच राहिला. (वार्ताहर)

Web Title: The tide in the Wagre valley collapsed