टंचाई आराखड्यात अल्प कपात

By Admin | Updated: January 14, 2017 00:42 IST2017-01-14T00:42:27+5:302017-01-14T00:42:39+5:30

टॅँकरच्या संख्येत घट : गावेही घटली

Short cut in the scarcity plan | टंचाई आराखड्यात अल्प कपात

टंचाई आराखड्यात अल्प कपात

नाशिक : टंचाई कृती आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू करण्याची वेळ समीप आलेली असताना जिल्हा परिषदेने तयार केलेल्या कृती आराखड्यात बदल करण्यात आला असून, जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला शिल्लक पाणीसाठा व पाण्याची मागणी याचा ताळमेळ बसविताना टॅँकरच्या संख्येत घट होऊन खर्चातही कपात करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेने डिसेंबर महिन्यात सादर केलेल्या टंचाई कृती आराखड्यात सुमारे दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात येऊन जिल्ह्यात ४७१ गावे व ८३४ वाड्या अशी सुमारे १३०५ गावे, वाड्यांना यंदा भीषण पाणीटंचाई भासण्याची शक्यता व्यक्त करून त्यावर उपाययोजनांसाठी आराखडा तयार करण्यात आला. मुळात आॅक्टोबर ते डिसेंबर हा कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा पहिला टप्पा असताना जिल्हा परिषदेने डिसेंबरअखेर आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविला. गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी झाल्याने भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा पाण्याची मागणी घटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना प्रत्यक्षात जिल्हा परिषदेचा आराखडा अपेक्षेपेक्षा अधिक खर्चिक असल्याने त्याची खातरजमा करण्यात आली. त्यातील काही योजनांची गरज नसल्याचे तसेच गेल्या काही वर्षांत टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करण्यात आल्याने टंचाईची गावे घटली आहेत, शिवाय जलयुक्त शिवार योजनेमुळेही काही गावांमध्ये अजून तरी पाण्याची मागणी होण्याची चिन्हे नाहीत.(प्रतिनिधी)

त्यामुळे या आराखड्यात कपात सूचविण्यात आली असून, नवीन आराखड्यानुसार २३८ गावे, ६२३ वाड्यांना पाणीटंचाई भासेल व त्यासाठी १२८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, असा अंदाज आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Short cut in the scarcity plan