दारावर लावली ‘ति’च्या नावाची पाटी

By Admin | Updated: January 15, 2017 00:26 IST2017-01-15T00:26:40+5:302017-01-15T00:26:51+5:30

वडपाडा : पेठ तालुक्यातील शाळेचा अनोखा उपक्रम

The name 'T' on the door | दारावर लावली ‘ति’च्या नावाची पाटी

दारावर लावली ‘ति’च्या नावाची पाटी

 पेठ : स्वत:च्या घराला नावाची पाटी म्हणजे प्रत्येकासाठी एक भूषण असते. त्यातही बहुतांश घरांना कुटुंब प्रमुखाचे नाव असलेली पाटी आढळून येते. मात्र पेठ तालुक्यातील वडपाडा अतिदुर्गम पाड्यावरील घरांना पाट्या आहेत. त्या घरातील लेकीच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्र म राबविण्यात आला आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर लेक शिकवा अभियान राबवले जात असून, याअंतर्गत विविध उपक्र मांचे आयोजन करण्याच्या शासनस्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आल्या. मात्र वडपाडा येथील शिक्षक सचिन इंगळे व जाधव यांच्या संकल्पनेतून शाळेत येणाऱ्या सर्व मुलींच्या नावाच्या पाट्या तयार करून त्या मुलींच्या घराला लावण्यात आल्या.
घराघरावर कामिनी निवास, मयूरी निवास, जयश्री निवास, कल्याणी निवास अशा पाट्या दिसू लागल्या. या उपक्रमाने मुलींचे आईवडीलही भारावून गेले. ग्रामीण व आदिवासी भागात मुलगी म्हणजे दुसऱ्याचे धन मानले जात असले तरीही वडपाडा शाळेच्या या छोट्याशा उपक्रमाने सावित्रीच्या या लेकींना एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
लेक शिकवा अभियानअंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वडपाडा शाळेतील मुलींनी साकारलेल्या सावित्री व जिजाऊ यांच्या भूमिका आकर्षण ठरल्या. शालेय जीवनापासूनच चिमुकल्यांना राष्ट्रभक्तीचे धडे देणारी वडपाडा येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा गावकऱ्यांचे ज्ञान मंदिर झाले आहे.
(वार्ताहर)

Web Title: The name 'T' on the door