Nashik Crime: आई म्हणाली 'बेवड्या', त्याने भिंतीवर आपटले डोके; नौदलातून बडतर्फ मुलाने जन्मदात्रीला घरातच संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:21 IST2025-10-08T15:17:05+5:302025-10-08T15:21:22+5:30
Son Killed Mother News: नाशिकमध्ये नौदलातून बडतर्फ करण्यात आलेल्या एका मुलाने त्याच्या आईची हत्या केली. गांजा आणि दारुच्या आहारी गेलेला हा मुलगा आईला दररोज त्रास देत होता.

Nashik Crime: आई म्हणाली 'बेवड्या', त्याने भिंतीवर आपटले डोके; नौदलातून बडतर्फ मुलाने जन्मदात्रीला घरातच संपवले
Nashik Crime News: दारूसह अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यसनाधीन युवकाने जन्मदात्री आईला राहत्या घरात झोपेतच मध्यरात्री ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. ७ ऑक्टोबरला घडलेली ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मंगला संतोष गवळी-घोलप (६२) असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून, पोलिसांनी संशयित आरोपी मुलगा स्वप्नील संतोष घोलप (३७) याला अटक केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सातपूर कॉलनीतील श्रीराम चौक येथे मुलासोबत राहणाऱ्या सेवानिवृत्त विस्तार अधिकारी मंगला गवळी-घोलप यांच्यात सातत्याने वाद होते.
गांजा, दारूचे व्यसन; आईला त्रास द्यायचा
दारु, गांजाच्या आहारी गेलेल्या स्वप्नीलकडून आईला नेहमीच त्रास दिला जात होता. रात्री दहा वाजेच्या सुमारास तो मद्यधुंद अवस्थेत घरात आला. त्याने आईसोबत वाद घातला. वाद सुरू असताना आई त्याला बेवड्या म्हणाली. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला. यानंतर त्याने मध्यरात्री आईच्या डोक्यावर टणक वस्तूने जोरदार प्रहार करत खून केल्याचे सकाळी उघडकीस आले.
स्वप्नील हा व्यसनाधीन असल्यामुळे तो वृद्ध आईला कायम त्रास द्यायचा, अशी माहिती समोर आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. स्वप्नील यास संशयावरून ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मयत मंगला यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.
भिंतीवर डोके आपटले
मद्यधुंद अवस्थेत रात्री स्वप्नील याने स्टीलच्या काठीने त्याच्या आईच्या डोक्यात जोरदार प्रहार केला आणि डोके भिंतीवर आपटून ठार मारल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नौदलातून केले बडतर्फ
स्वप्नील हा नौदलात जवान होता; मात्र बेशिस्त वर्तणुकीमुळे त्याला बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली.
प्रारंभी बनाव करण्याचा डाव
पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेताच स्वप्नील याने प्रारंभी आईला अज्ञातांनी ठार मारून पलायन केले, असा बनाव करण्याचा डाव केला; मात्र पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावत कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
२०२३ साली आईची तक्रार
मंगला गवळी यांनी सातपूर पोलिसांत २०२३ साली धाव घेत मुलाविरुद्ध तक्रार दिली होती. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता.