दिंडोरी : शहरातील गांधीनगर प्रभागात बिबट्याने आगमन केले असून बिबट्याला शेतकऱ्यांनी पिटाळून लावले. याप्रकरणी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जाधव वस्ती मळ्यात व सप्टेशन परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे. मागील महिन्यात बिबट्याने दत्तात्रय जाधव यांच्या घराजवळ येऊन शेळी ठार केली होती. आता दिवसाआड बिबट्या जाधव वस्तीवर येत आहे. गांधीनगरच्या मोकळ्या रस्त्यावरून बिबट्याला जाताना एका दुचाकीस्वाराने पाहिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्याला पाहिले. शांताराम जाधव, सीताराम जाधव, बापू जाधव, गणेश जाधव, भगवान जाधव, विनोद जाधव यांच्यासह युवक शेतकऱ्यांनी त्याला पिटाळून लावले. बिबट्या परत निळवंडी रस्त्याकडे पळाला. तेथेही शेतकऱ्यांनी त्यास पिटाळून लावले. बिबट्या मोहळ बन परिसरात जास्त वेळ येत आहे. तो संध्याकाळी गांधीनगर जाधव नगर वस्ती परिसरात येत असल्याने नागरिकांनी लहान मुलांची काळजी घेऊन सावध रहावे व वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे.
दिंडोरीतील जाधव वस्तीत बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST