अंशकालीन निदेशकांचा प्रश्न मार्गी लागणार

By Admin | Updated: July 29, 2014 00:54 IST2014-07-29T00:25:22+5:302014-07-29T00:54:52+5:30

प्राथमिक शिक्षकसंघाच्या शिष्टमंडळास शिक्षणमंत्री यांचे आश्वासन

The issue of part-time directors will be needed | अंशकालीन निदेशकांचा प्रश्न मार्गी लागणार

अंशकालीन निदेशकांचा प्रश्न मार्गी लागणार

पेठ : दोन वर्षांपूर्वी राज्यातील वरिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयासाठी नेमणूक केलेल्या अंशकालीन निदेशकांना पुन्हा नियुक्ती देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी प्राथमिक शिक्षकसंघाच्या शिष्टमंडळास दिले़
प्राथमिक शिक्षकसंघाचे राज्य अध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन संबंधित विषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत राज्यातील अंशकालीन निदेशकांना पुन्हा नियुक्ती देण्यासंदर्भात येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.
सदरच्या आश्वासनामुळे अंशकालीन निदेशकांना दिलासा मिळणार आहे़ शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी शासनाने यापूर्वी वरिष्ठ शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांची नियुक्ती केली होती, मात्र सदरची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची व शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकारात करण्यात आल्याने केवळ वर्षभरात या निदेशकांना कार्यमुक्त करण्यात आले होते़ तेव्हापासून या निदेशकांना पुन्हा सामावून घेण्यासाठी संघाचे प्रयत्न सुरू होते़
शिष्टमंडळात राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, राज्य उपनेते वसंतराव हारगडे, दीपिका पुंडे यांच्यासह प्राथमिक शिक्षकसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते़ (वार्ताहर)

Web Title: The issue of part-time directors will be needed