चार घरे कोसळली...

By Admin | Updated: August 1, 2014 01:09 IST2014-08-01T00:47:11+5:302014-08-01T01:09:23+5:30

काझीची गढी खचली : जीवितहानी टळली; रहिवासी स्थलांतरास राजी

Four houses collapsed ... | चार घरे कोसळली...

चार घरे कोसळली...

नाशिक : शहरात सुरू असलेल्या पावसामुळे काझीच्या गढीचा काही भाग आणखी खचला. त्यामुळे त्यावरील चार घरे कोसळली. सुदैवाने ती रिकामी असल्याने जीवित वा वित्तहानी झाली नाही. भीमाशंकर येथे डोंगर खचल्यामुळे गाव नष्ट झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाली असून, गढीवरील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या. शुक्रवारपासून (दि. १) रहिवासी गाडगे महाराज धर्मशाळेत स्थलांतरित होणार आहेत.
गेल्या सोमवारपासून शहरात पाऊस सुरू असून, दोन दिवसांपासून गढी खचत आहे. त्यामुळे पालिकेकडून या रहिवाशांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. काल संबंधित रहिवाशांना स्थलांतरित होण्यास सांगूनही ते राजी होत नव्हते. महापालिकेने पावसाळ्याापूर्वीदेखील रहिवाशांना नोटिसा बजावल्या होत्या; परंतु त्याचा उपयोग होत नव्हता. दरम्यान, काल भीमाशंकर येथे डोंगरच गावावर कोसळल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले. आज सकाळी गढीवरील चार बंद घरे कोसळल्यानंतर यंत्रणेने धावपळ केली. अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेच्या यंत्रणेने रहिवाशांना स्थलांतरित होण्यास सांगितले; परंतु ते तयार होत नव्हते. पोलिसांनी त्यांची नावे आणि भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून घेतले. त्यानंतर सायंकाळी पोलीस उपआयुक्त विजय बारगळ, पोलीस निरीक्षक कड, महापालिकेचे अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन, नगरसेवक विनायक खैरे, रंजना पवार, पूर्व प्रभागाच्या विभागीय अधिकारी शिरसाठ यांच्यासह रहिवासी उपस्थित होते. रहिवाशांनी गाडगे महाराज धर्मशाळेच्या खोल्यांमध्ये स्थलांतरित व्हावे, धर्मशाळेचे भाडे महापालिका भरेल या अटीवर रहिवासी तूर्तास तयार झाले आहेत. शुक्रवारी सकाळपासून सर्व रहिवासी स्थलांतरित होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याठिकाणी जुन्या भग्नावस्थेत असलेल्या मशिदीचा ढाचा धोकादायक असल्याने तो उतरवून घेण्यास विश्वस्तांना सांगण्यात आले आहे; परंतु विश्वस्त ऐकण्यास तयार नसल्याने अद्याप त्यावर निर्णय होऊ शकला नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Four houses collapsed ...