केबीसी कार्यालयाला आग

By Admin | Updated: September 6, 2016 00:39 IST2016-09-06T00:38:32+5:302016-09-06T00:39:50+5:30

टेबल जळाले : कुलूपबंद कार्यालयातील आगीमुळे तर्कवितर्क

Fire to KBC office | केबीसी कार्यालयाला आग

केबीसी कार्यालयाला आग

नाशिक : राज्यभरातील गुंतवणूकदारांना तिप्पट व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या संशयित भाऊसाहेब चव्हाण याचे मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलशेजारी असलेल्या केबीसी कंपनीच्या कुलूपबंद कार्यालयास सोमवारी (दि़५) सायंकाळी अचानक आग लागली़ या आगीमध्ये कार्यालयातील टेबल जळून खाक झाले असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे़ दरम्यान, अनेक दिवसांपासून बंद असलेल्या कार्यालयाला आग लागली की लावली, अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले होते़
केबीसी फसवणूकप्रकरणी कंपनीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण यांच्यासह संचालकांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यानंतर भाऊसाहेब व आरती चव्हाण हे दोघे आपल्या कुटुंबींयासह सिंगापूरला पळून गेले होते़ या दोघांना काही महिन्यांपूर्वीच नाशिक पोलिसांनी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले होते़ यानंतर या दोघांची राज्यभरात दाखल असलेल्या गुन्ह्णांमध्ये चौकशी करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत़
केबीसी कंपनीच्या कार्यालयातून पोलिसांनी गुन्हे दाखल झाल्यानंतर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, हार्डडिस्क तसेच रोख रक्कमही जप्त केलेली आहे़ सद्यस्थितीत सील करण्यात आलेल्या व कुलूपबंद असलेल्या या कार्यालयात आग लागल्याची घटना घडल्याने कार्यालयात आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत का? आणि नसतील आग लावण्याचा प्रयत्नाचे कारण काय याबाबत चर्चा सुरू झाली आहे़ केबीसी कार्यालयास आग लागल्याची माहिती सिद्धार्थ अग्रवाल या इसमाने अग्निशमन दलास दिली होती़ (वार्ताहर)

Web Title: Fire to KBC office