चांदीचा रथ अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: January 25, 2016 22:51 IST2016-01-25T22:51:52+5:302016-01-25T22:51:52+5:30

त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव

In the final stage of silver chariot | चांदीचा रथ अंतिम टप्प्यात

चांदीचा रथ अंतिम टप्प्यात

त्र्यंबकेश्वर : लोकवर्गणीतून तयार करण्यात येणारा सुमारे ८० लाख रुपयांचा संत निवृत्तिनाथांचा चांदीचा रथ येत्या आठवड्याभरात पूर्ण होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष यांनी दिली. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव व संपूर्ण महाराष्ट्रातील आगळा-वेगळा असे या रथाचे वैशिष्ट असणार आहे.
नाशिक येथील बाफणा ज्वेलर्स या सराफ पेढीमार्फत हा देखणा रथ तयार करून दिला जात आहे. त्यांचे कारागीर रात्रंदिवस झटत आहे. कटिंग केलेले चांदीचे पत्रे एका दानपेटीत जमा होत आहेत. हेच तुकडे वजन करून बाफणा ज्वेलर्स यांना परत केले जाणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड यांनी सांगितले.
आत्तापर्यंत त्र्यंबकेश्वर देवस्थानची पालखी पंढरपूर येथे साध्या रथातून जात असे. पूर्वी तर रथही नव्हता केवळ पालखी जात असे. त्यानंतर रथ तयार केला गेला. अर्थात रथाला रबरी टायर लावलेले होते व रथाची लांबी रुंदी वाढविण्यात आली. यापुढे मात्र संपूर्ण सागवानी व त्यावर साधारणपणे २०० किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या पत्र्याचा मुलामा दिला जात आहे.
यावर्षी आषाढीवारीच्या पंढरपूर यात्रेसाठी संत निवृत्तिनाथांच्या पादुका पंढरपूर येथे याच नूतन चांदीच्या रथातून नेण्यात येतील. सुमारे दहा हजार भाविक असलेल्या निवृत्तिनाथांच्या दिंडी सोहळ्याला या वर्षी एक आगळे-वेगळे महत्त्व लाभणार आहे, असे संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबक गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी बाफणा ज्वेलर्सचे कारागीर, देवस्थानचे पारंपरिक पुजारी तथा विश्वस्त जयंत गोसावी, सुरेशबुवा गोसावी, पुंडलिक थेटे, रामभाऊ मुळाणे, बहिरू मुळाणे आदि उपस्थित होते.
दरम्यान, निवृत्तिनाथ समाधी संस्थानने चांदीचा रथ निर्माण करू, असे वचन दिले होते. त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरेत या रथामुळे आणखी भरच पडणार आहे. (वार्ताहर)

Web Title: In the final stage of silver chariot