पेठ येथे विजेची उपकरणे जळाली

By Admin | Updated: April 2, 2016 00:02 IST2016-04-01T23:24:33+5:302016-04-02T00:02:24+5:30

रोहित्रातील बिघाडामुळे नागरिकांना फटका

Electric appliance burned at Peth | पेठ येथे विजेची उपकरणे जळाली

पेठ येथे विजेची उपकरणे जळाली

पेठ : ऐन उन्हाळ्यात वीज वितरण कंपनीने एकीकडे वीज दरवाढीचा शॉक दिला असून, दुसरीकडे याच कंपनीच्या गलथानपणामुळे ग्राहकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागल्याचा प्रकार घडला आहे.
शहरातील बाजारपेठ परिसरातील वीज वितरण कंपनीच्या रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने अनेक घरांमधील टीव्ही, रेफ्रिजरेटर आदि विजेची उपकरणे नादुरूस्त झाली आहेत. रोहित्र बदलण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे नागरिकांना दुपारी उकाड्याने हैराण केले.
आज सकाळी ७ वाजेदरम्यान बाजारपेठ परिसरातील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाल्याने अनेक घरांमधील बल्ब उडाले. काही समजण्याच्या आत टीव्ही संच व रेफ्रिजरेटरही नादुरूस्त होऊन बंद पडले. नंतर याची चर्चा होताच नागरिकांनी बल्ब व अन्य उपकरणे बंद केली. परंतु वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नक्की किती घरांमधील विद्युत उपकरणे खराब, नादुरूस्त झाली याची माहिती मिळू शकली नाही. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना १ वाजेदरम्यान माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठेतील वीजपुरवठा बंद करण्यात आला असला तरीही सायंकाळी उशिरापर्यंत रोहित्र बदलण्याचे काम सुरू करण्यात न आल्याने परिसरातील नागरिकांना ऐन दुपारी उकाड्याचा सामना करावा लागला.
याबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांशी संपर्कसाधला असता त्यांनी सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची कामे बंद पडत असल्याचे कारण दिले असून, नागरिक वीजपुरवठा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Electric appliance burned at Peth