फेरबदलानंतर इच्छुकांची भाऊगर्दी

By Admin | Updated: January 15, 2017 00:34 IST2017-01-15T00:34:22+5:302017-01-15T00:34:50+5:30

सर्वसाधारण गट : तिकीट न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता

Brother-in-law after shuffle | फेरबदलानंतर इच्छुकांची भाऊगर्दी

फेरबदलानंतर इच्छुकांची भाऊगर्दी

 महेश गुजराथी चांदवड
येथे नगरपरिषद अस्तिवात आल्याने तालुक्यातील एक गट कमी होऊन जिल्हा परिषद गटाच्या पुनर्रचनेत गावांची संख्या वाढली, तर तळेगाव रोही गट सर्वसाधारण झाल्याने इच्छुकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गटात रथी-महारथी उभे राहणार असल्याने जिल्ह्याचे या गटाकडे लक्ष लागून आहे.
तळेगाव रोही गण नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला राखीव झाल्याने अनेक नेत्यांच्या सौभाग्यवती येथे उभ्या राहण्यास इच्छुक आहेत. वाहेगावसाळ गण नागारिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने ज्यांना गटात प्रतिनिधित्व मिळणार नाही त्यांनी दुधाची तहान ताकावर भागवण्याची तयारी केली आहे. पक्षाकडून इच्छुकांना तिकीट न मिळाल्यास बंडखोरी होण्याची चिन्हं गटात व गणात दिसून येत असली तरी गुरू-शिष्यांच्या अस्तिवाची लढाई होईल, असे चित्र दिसत आहे. भाजपाकडून डॉ. आत्माराम कुंभार्डे व डॉ. राजेंद्र दंवडे यांची चर्चा सुरू असली तरी माजी आमदार या गुरूकडून त्यांचे चिरंजीव राहुल कोतवाल हे उमेदवारी करणार हे स्पष्ट असल्याचे बोलले जात आहे, तर राष्ट्रवादीकडून अनिल काळे उमेदवारी करतील असे बोलले जात आहे.
एकेकाळचे गुरू-शिष्य अर्थात माजी आमदार शिरीष कोतवाल यांना गुरूमानून तालुक्याच्या राजकारणात आलेले डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी गेल्या विधानसभेची वेळ साधून कोतवाल यांना सोडचिठ्ठी दिली. दरम्यान, कुंभार्डे यांच्यामुळे कोतवालांना २० वर्षांच्या सतेतून पायउतार व्हावे लागले. तालुक्याच्या राजकारणात शिरीष कोतवाल यांच्यानंतर गावोगावी कार्यकर्त्यांची फळी जोडणारे डॉ. कुंभार्डे एकमेव आहेत. म्हणून आगामी राजकारणात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी कुंभार्डे यांना रोखणे, राजकारणात सक्रीय राहण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोतवाल उडी घेणार हे नक्की आहे. त्यांनी आपले चिरंजीव राहुल कोतवाल यांना उभे करून जिल्हा परिषदेच्या निमित्ताने राजकारणात प्रवेश होणार आहे.

Web Title: Brother-in-law after shuffle